हिंगणा (नागपूर) : भांडण झाल्यानंतर मित्र-मैत्रिणीने संगनमत करून तरुणास कारमध्ये मारहाण केली आणि त्याच्याकडील कारसह राेख रक्कम हिसकावून घेत पळ काढला. ही घटना गुरुवारी (दि. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ गावाजवळ घडली. विशेष म्हणजे, तरुण हा त्या दाेघांचाही मित्र हाेय. या प्रकरणातील दाेन्ही आराेपीस शनिवारी (दि.१५) अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये अश्विन पंढरी कोडापे (३६, रा. आदर्शनगर, वाडी, ता. नागपूर ग्रामीण) याच्यासह फुटाळा, अंबाझरी, नागपूर येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. अश्विन वाडी शहरात राेडलगत कपडे विकण्याचा धंदा करताे. काही दिवसांपूर्वी खिलचंद गोपीचंद बिटले (३५, रा. भुजबळ लेआउट, जुनी वस्ती भामटी, त्रिमूर्तीनगर, नागपूर) याची अश्विन व त्या तरुणीसाेबत ओळख झाली हाेती. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले.
काही दिवसांपूर्वी खिलचंद व अश्विन यांच्या पैशावरून वाद उद्भवला हाेता. त्यातच खिलचंद गुरुवारी सायंकाळी त्याच्या एमएच-१४/बीडब्ल्यू-००१८ क्रमांकाच्या कारने वाडीला गेला हाेता. अश्विन व त्या तरुणीने खिलचंदला पेठ येथील प्लाॅट बघायला चालण्याची सूचना केली. त्याने हाेकार देताच दाेघेही त्याच्या कारमध्ये बसले. वाटेत त्यांनी दारू खरेदी केली. तिघेही रात्री १० वाजताच्या सुमारास पेठ गावाजवळ पाेहाेचले. तिथे तिघेही दारू प्यायले.
तिथे खिलचंद व अश्विन यांच्यात भांडण झाले. अश्विन व तरुणीने खिलचंदला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर, त्याच्यावर कटरने वार केले. यात ताे जखमी झाला. त्यानंतर त्या दाेघांनी खिलचंदकडील १ लाख ७५ हजार रुपयांची कार, एक लाख रुपये राेख आणि ५० हजार रुपयांचा माेबाइल फाेन असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून घेत दाेघांनी ही पळ काढला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी खिलचंदच्या तक्रारीवरून भादंवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. दाेन्ही आराेपींना शनिवारी वाडी शहरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना साेमवार (दि.१७) पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.