लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून अक्षरश: कोलमडलेल्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. संसर्ग बराचसा नियंत्रणात आल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यासाठी नवीन नियमावली जारी केली आहे.
‘ब्रेक दे चेन’अंतर्गत २२ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, शिवाय नियमांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनालादेखील मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जलतरणपटूंनादेखील मोठा दिलासा मिळाला असून २२ ऑक्टोबरपासून जलतरण तलावदेखील सुरू होणार आहेत.
‘कोरोना’मुळे ही सर्व क्षेत्रे अक्षरश: डबघाईला आली होती व अनेकांनी व्यवसायाचे दुसरे मार्ग शोधण्याची तयारीदेखील केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनंतर सांस्कृतिक क्षेत्र व जलतरणपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाच्या नियमावलींचे पालन करूनच ‘पुनश्च हरिओम’ करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जलतरण तलाव सुरू करणे सोपे नाही
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतरच जिल्ह्यातील जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. २२ ऑक्टोबरपासून जलतरण तलाव सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तर शहरातील अनेक जलतरण तलावांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. २२ ऑक्टोबरपासून त्यांना सुरू करणे कठीण असेल.
शहरात मनपा संचालित दोन जलतरण तलाव आहेत. याशिवाय अंबाझरीत नासुप्र व रघुजीनगरात कामगार कल्याणचा जलतरण तलाव आहे. काही महाविद्यालये व सीपी क्लबमध्येदेखील जलतरण तलाव आहेत. अनेक दिवसांपासून तलाव बंद असून देखरेख नसल्याने बहुतांश ठिकाणी डागडुजी करावी लागणार आहे. आग्याराम देवी चौक स्थित मनपाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुलाचे संचालक शैलेश घाटे यांनी तेथील जलतरण तलाव तयार व्हायला वेळ लागेल, असे स्पष्ट केले. गरमी वाढत असल्याने जलतरणपटू उत्सुक असून दररोज २० ते २५ लोक विचारणा करायला येत असल्याचे त्यांनी सांगितले.