नागपूर : एटीएममध्ये प्लॉस्टीकच्या पट्टी टाकून पैशांची चोरी करणाऱ्या आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच १२ तासाच्या आत अटक करून आरोपीच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेल्या प्लॉस्टीकच्या २१ पट्ट्यासह ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहम्मद इस्तियाक मोहम्मद यासीन (२३, रा. गोहनिया, अलाहाबाद उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ७ सप्टेंबरला सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास मानेवाडाच्या परिवर्तन चौकात अॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनला पट्टी लाऊन कोणीतरी टँपरींग करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार बँकेचे दुर्गेश अरुण कोळंबकर (३९, रा. ब्राह्मणी कळमेश्वर) यांनी हुडकेश्वर पोलिसांना दिली. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अनोळखी आरोपीविरुद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (३) नुसार गुन्हा दाखल केला. तपासात हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, निरीक्षक नागेशकुमार चातरकर, ओमप्रकाश भलावी, गोपाल देशमुख, संदिप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतन वेद्य, तारा अंबाडरे, विजय सिन्हा, मंगेश मडावी, हिमांशू पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक तपास करून पोलिसांनी हुडकेश्वर रोडवरील अॅक्सीस बँकेजवळ संशयास्पद स्थिती दिसलेल्या व्यक्तीला आवाज दिला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने प्लास्टीक पट्टीचा वापर करून एटीएममधील पैशांची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून रोख ९६०० रुपये, प्लास्टीकच्या २१ पट्ट्या, मोबाईल असा एकुण ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.