नागपूर : एटीएममध्ये पट्टी लावून पैसे चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेशातील टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने गजाआड करून त्यांच्या ताब्यातून ५ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अतुल विश्राम पाल (१९), रोहित बहादुरसिंग (२४) दोघे रा. तारापुर बाजार, लालगंज अजरा, जि. प्रतापगढ उत्तरप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नागपूर शहरात सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, जुनी कामठी परिसरात असलेल्या विविध बँकांच्या एटीएममध्ये पट्टी टाकून पैसे काढण्यात येत असल्यामुळे तेथे अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०५ (अ), ३२४ (४) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासात सीसीटीव्ही फुटेजद्वारे तांत्रीक तपास करून गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने आरोपी अतुल आणि रोहितला ताब्यात घेतले. त्यांचे साथीदार पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी समृद्धी महामार्गाने पाठलाग करून धामनगाव येथे आरोपी शिवमुर्त रामखिलवान पाल (२४, रा. रामनगर चौराह, ता. कुंडा जि. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) यास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. आरोपींचे आणखी दोन साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले. आरोपींच्या ताब्यातून रोख २८ हजार ५०० रुपये, तीन मोबाईल, एटीएममध्ये टाकत असलेल्या पट्टया असा एकुण ५ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.