आरपीएफची कारवाई : १० हजाराचा मुद्देमाल लंपास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणे हा रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वेच्या १० हजारांच्या संपत्तीची चोरी करणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाचा जवान जगदीश सोनी, केदार सिंह नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना दोन संशयित व्यक्ती रेल्वेच्या भिंतीवरून उडी मारून एस अँड टी कार्यालयाच्या (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) मागे जाताना दिसले. त्यांना आरपीएफच्या जवानांनी घेरले असता ते झुडपात बसून काहीतरी तोडताना दिसले. त्यांच्याजवळ एक बॅटरी तुटलेल्या अवस्थेत आढळली. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. लगेच याची सूचना आरपीएफ ठाण्यात दिल्यानंतर उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, होती लाल मिना, रजनलाल गुर्जर, सुशिल मलिक हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे ओंदु दुबे मालाकार (३६) आणि हथौडी किसना मालाकर (१९) रा. बिगना जि. बाकुंडा (पश्चिम बंगाल) असे सांगितले. त्यांनी शुक्रवारी पहाटे ५ वाजता एस अँड टी कार्यालयाची भिंत ओलांडून आतील बॅटरी आणि दोन पांढऱ्या रंगाच्या मशिनची (अर्थ डिटेक्टर मशिन) चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या साहित्याची किंमत १० हजार रुपये आहे. दोन्ही आरोपींच्या विरुद्ध आरपीयूपी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वे संपत्तीची चोरी करणारे अटकेत
By admin | Published: July 08, 2017 2:12 AM