लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेमडेसिविरच्या कृत्रिम टंचाईने गडचिरोलीसारख्या जिल्ह्याच्या सरकारी रुग्णालयातही सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील पल्लवी मेश्राम (वय ३५) नामक परिचारिकेने दोन आठवड्यांपूर्वी एक-दोन नव्हे तर चक्क १२ रेमडेसिविर इंजेक्शन चोरून ते काळाबाजार करणाऱ्यांना सोपविल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी बेलतरोडी पोलिसांनी रेमडेसिविरची ब्लॅकमार्केटिंग करणाऱ्या टोळीतील मनोज वामनराव कामडे (वय ४०, रा. जुनी शुक्रवारी), अतुल भीमराव वाळके (वय ३६, रा. आयुर्वेदिक ले-आऊट), पृथ्वीराज देवेंद्र मोहिते (वय ३६, रा. रहाटे काॅलनी), अनिल वल्लभदास ककाणे (वय ५२, रा. टेलिफोन एक्सचेंज चौक) आणि अश्विन देवेंद्र शर्मा (वय ३२, रा. गावंडे ले-आऊट, नरेंद्रनगर) यांना जेरबंद केले होते. या टोळीकडून सात रेमडेसिविर जप्त करण्यात आले. प्राथमिक चाैकशीत नगरसेविकेचा दीर असलेला मनोज कामडे आणि कंत्राटदार वाळके हे दोघे या टोळीचे सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली, मात्र हे भामटे तोंड उघडायला तयार नव्हते. पोलिसांनी आरोपींना बाजीराव दाखवताच धक्कादायक माहिती उघडकीस आली. आरोपी वाळके याची मेव्हणी पल्लवी मेश्राम गडचिरोली सरकारी रुग्णालयात आठ वर्षांपासून कार्यरत आहे. तेथून तिने हे इंजेक्शन चोरले अन् वाळकेला दिल्याचेही उघड झाले. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांचे पथक गडचिरोलीत पोहोचले. तेथून त्यांनी पल्लवीला ताब्यात घेतले. आज हे पथक नागपुरात आले. तिने रेमडेसिविर चोरीची कबुली दिल्याचे समजते.
----
आता ती कुणाचे नाव सांगणार?
पल्लवीला पोलीस सोमवारी न्यायालयात हजर करून तिच्या पीसीआरची मागणी करणार आहेत. ती आता आणखी कोणती माहिती देते, कुणाचे नाव सांगते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
---