नागपूर : हुडकेश्वर येथील अयोध्यानगरात एका कोचिंग क्लास संचालकाच्या घरून चोरट्यांनी रोख रकमेसह ४.५५ लाखाचे दागिने चोरून नेले.
रिसक राणेकर हे आरएमएस कॉलनी राहतात. ते कोचिंग क्लास चालवतात. नातेवाईकांकडे लग्न असल्याने ते ३ जानेवरी रोजी परिवारासह चंद्रपूरला गेले होते. या दरम्यान चोरांनी मेन गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु मेनगेटवर सेंट्रल लॉक असल्याने कुलूप उघडले नाही. त्यामुळे चाोरांनी बााथरुमच्या व्हेंटिलेटरची खिडकी तोडून आत प्रवेश केला. खिडकीवर केवळ ग्लास लागला होता. ग्लास तोडून आरोपी घरात शिरले. बेडरूममध्ये ठेवलेले २ लाख रुपये रोख, एक किलो चांदीची भांडी व सोन्याचे दागिने असे एकूण ४ लाख ५५ हजार रुपये किमतीचा माल घेऊन आरोपी फरार झाले.
राणेकर गुरुवारी दुपारी घरी परतले. तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरु केली. रोख रक्कम कोचिंग क्लासची होती. राणेकर यांच्या घरी सीसीटीव्ही सुद्धा होते. परंतु काही दिवसांपूर्वीच घरी दुरुस्तीचे काम झाल्याने राणेकर यांनी सीसीटीव्ही काढून ठेवले. चंद्रपूरवरून परतल्यावर ते लावणार होते. त्यापूर्वीच चोरी झाली. आरोपींना घराची माहिती असल्याची शंका आहे.