नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामूहिक बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लीप तयार केल्याचा आणि ती क्लीप व्हायरल करण्याचा धाक दाखवून वारंवार मित्रांकडून सामूहिक बलात्कार करवून घेतल्याचा आरोप लागलेले छोटे बाबा आणि बंटी श्रीवास हे दोघे कारागृहातून बाहेर येऊन आता तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. ते प्रकरणच बोगस होते. असे काही घडलेच नाही, हे पोलीस तपासात उघड झाल्याने पोलिसांनी तसा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यामुळे कारागृहाने ही केसच डिसमिस केली. ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. मात्र, तिरस्कृत नजरांमधून मिळणारी शिक्षा कायमच असल्याने ते दोघे शापित अश्वत्थामासारखे जीवन जगत आहेत.
काय आहे ही नेमकी घटना? नागपुरातील एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या मित्रांवर सामुहिक बलात्काराचा आरोप लावला. त्या आरोपाकरिता या मित्रांना पोलिसांनी पकडले. जो गु्न्हा त्यांनी केलाच नव्हता त्याची फार मोठी शिक्षा त्यांना भोगावी लागली. त्यांच्या कुटुंबियांनी व समाजाने त्यांना वाळीत टाकले.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात (जो गुन्हा घडलाच नाही) दोन तरुण नाहक गोवले गेले अन् ते आता शापित अश्वत्थामासारखे भळभळते मन घेऊन जगत असल्याची कुणकुण लागल्यानंतर लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने या दोघांची भेट घेतली. त्यांना धीर देत, आश्वस्त करीत बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फारच कमी बोलले.त्यांच्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे. मात्र, शब्दच त्यांना साथ देत नाही. ते मनातून थरारले आहे. त्यांच्या हृदयावरची जखम त्यांच्या वेदनांना शब्दाने नव्हे तर अश्रूच्या मार्गानेच वाट मोकळी करून देते. ते म्हणतात, खोट्या सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांकडून आणि नंतर कारागृहातील कैद्यांकडून मार खावा लागला. पाठ सोलली गेली, त्या वेदना विसरलो. मात्र, त्यामुळे झालेला, होत असलेला प्रचंड मनस्ताप कोणत्या डॉक्टरांकडून कमी होईल, असा छोटे बाबा आणि बंटी श्रीवासचा प्रश्न आहे. बोलता बोलता कधी छोटे तर कधी बंटी थरथरतो. तो सर्व घटनाक्रम भयावह स्वप्नासारखाच वाटतो, असे ते म्हणतात.पुढे ते पुटपुटतात ‘पोलिसांनी पकडून नेल्यापासून तो कारागृहातून बाहेर येण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण एकेक वर्षासारखा जड होता. कारागृहात सारेच जण फासावर टांगायला तयार होते. ना धड जेवण मिळत होते, ना ते धकत होते. दुसरीकडे अट्टल गुन्हेगार गुलामासारखे वागवत होते. जीवच नकोसा झाला होता.किती दिवस केस चालेल अन् किती दिवस बदनामीचा आळ घेऊन जगावे लागेल. कारागृहातून सुटका होईल की तिच्या बयानावर कारागृहातच खितपत पडून राहावे लागेल, असे एक ना अनेक जीवघेणे प्रश्न मन शहारून टाकत होेते. मात्र, चमत्कार झाला. आरोपच नव्हे तर केसच डिसमिस झाली असे कारागृहातून सुटण्यापूर्वी एका अधिकाऱ्याने सांगितले अन् पुढचे काही तास मन भरून रडून घेतले. बाहेर आलो मात्र घरी जायची हिंमत होत नव्हती.घरच्या मंडळींची काय अवस्था असेल, आपल्यावर खोटा का होईना किळसवाणा आरोप लागल्याने घरच्यांना अघोषित सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला असेल, याची कल्पना असल्याने घराच्या मार्गावर पायच पडत नव्हता. कशीबशी हिंमत एकवटली. घरच्यांनी तर जागा दिली, मात्र शेजारची मंडळी आजही तिरस्कृत नजरांनीच बघतात.संतापजनक गुन्ह्यांचा कलंक माथ्यावर लागला आहे. तो कसा आणि कधी पुसला जाणार, हे कळतच नाही.’ आपली व्यथा मांडताना त्यांचा स्वर कापरा होतो अन् अश्रूही घळघळतात. शापित अश्वत्थामाच्या जखमेसारखीच त्यांच्या मनावर जखम झाल्याचा भास होतो.
त्यांचा प्रश्न समाजासाठी !सामूहिक बलात्काराचा आरोपी म्हणून माथ्यावर लागलेला कलंक कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. जिच्या आसपास आपण भटकलोच नाही, तिने एवढा गंभीर आरोप का लावला असेल, ते कळतच नव्हते. त्यात जे केलेच नाही, त्याच्यासाठी आजूबाजूची मंडळी जीवावर उठल्यासारखी झाल्याची खंत जास्त क्लेशदायी आहे. आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला कुणीही फासावर टांगायचं का, हा त्यांचा डबडबलेल्या डोळ्यांनी केलेला प्रश्न समाजाला अंतर्मुख करणारा ठरावा
कानात पडले शिव्यांचे अॅसिडकारागृहातून बाहेर आल्यानंतर बरेच दिवस त्यांनी कामासाठी पायपीट केली. अनेकांनी नकार दिला, तो स्वाभाविक होता. मात्र, नकार देताना ज्या शिव्या कानावर पडल्या, त्या या बिचाऱ्यांच्या कानावर अॅसिड ओतल्यासारख्या वाटत होत्या. बलात्कार झालेल्या पीडितेला शासकीय योजनेनुसार आर्थिक मदत मिळते. या दोघांच्या मनावर खोट्या आरोपाचे ओरबडे पडले आहे ते बलात्कारापेक्षा कमी नाही. त्यामुळे आता त्यांना कोणती अन् कोण मदत करणार, असा प्रश्न आहे.