लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.नंदनवन, गुरुदेवनगर येथील पेट्रोल पंपावर रविवारी झालेल्या लूटमार आणि खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने मंगळवारी याच पेट्रोल पंपावर बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी नागपुरातील तिन्ही कंपन्यांच्या जवळपास ९५ पेट्रोल पंपांचे मालक उपस्थित होते. यावेळी पेट्रोल पंप आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. असोसिएशनचे उपाध्यक्ष हरजितसिंग बग्गा यांनी सांगितले की, घटनेच्या निषेधार्थ असोसिएशनने नागपुरातील पंप मंगळवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवले. बहुतांश पंप मालकांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. पुढे महिन्यात चारही शनिवारी बँका बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पंपावर जमा होणारी रक्कम कुठे ठेवायची, हा गंभीर प्रश्न घटनेच्या निमित्ताने पंपचालकांसमोर उभा राहिला आहे.नागपुरातील सर्वच पंप रात्री ११ पर्यंत सुरू असतात. रात्रीपर्यंत जमा झालेली रक्कम घरी नेणे वा पंपावर ठेवणे अत्यंत जोखिमेचे काम झाले आहे. शनिवार आणि रविवारी बँका बंद असल्यामुळे मालकाने रक्कम कार्यालयात लॉकरमध्ये ठेवली. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. पंपावरील कर्मचाऱ्याने बाहेरील सहकाऱ्याच्या मदतीने रोख रक्कम लुटली आणि सुरक्षा गार्डचा खून केला. पंप रात्री ८ पर्यंत सुरू राहिल्यास मालकाला रोख घरी नेता येईल आणि लुटमारीच्या घटना घडणार नाही. जर रात्री ११ वाजेपर्यंत पंप सुरू राहिल्यास पोलिसांनी गस्त घालावी आणि पंपांना संरक्षण द्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता, उपाध्यक्ष हरजितसिंग बग्गा व मुश्तफा, सचिव प्रणय पराते, सर्वच पदाधिकारी आणि पंपमालक उपस्थित होते.
... तर नागपुरातील पेट्रोल पंप ८ वाजता बंद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 10:25 PM
पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देविदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन : बैठकीत प्रस्ताव, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार