आशिष सौदागर/विजय नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोपीला आमच्या ताब्यात द्या अथवा त्याचे हैदराबादसारखे एन्काऊंटर करा, अशी मागणी करीत तालुक्यातील नागरिकांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनसमोर कॅन्डल मार्च काढून निदर्शने केली. तर कळमेश्वर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केल्यामुळे पोलीस प्रशासन जिंदाबादची नारेबाजी करण्यात आली.हैदराबादमधील बलात्कार व हत्येची घटना ताजी असतानाच कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथील पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह लिंगा शिवारात संशयास्पद स्थितीत आढळल्याने तालुक्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलीस यंत्रणेने घटनास्थळाकडे धाव घेत प्रकरणाची चौकशी करीत अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रविवार कळमेश्वर तालुक्याचा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने या घटनेची माहिती संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. तालुक्यातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जमावाचे रौद्र रूप लक्षात घेता पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. तर सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान सर्वपक्षीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनसमोर कॅन्डल मार्च काढत जोरदार घोषणाबाजी केली. आरोपीला फाशी द्या किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणीही केली. तसेच एका असहाय चिमुकलीच्या झालेल्या हत्येचा संताप व्यक्त करीत आरोपीला हैदराबादसारखे एन्काऊंटर करा, अशी मागणी करीत संतप्त नागरिक नारेबाजी करीत होते. यासोबतच तालुक्यातील एकाही वकिलाने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान संतप्त जमावाला पोलिसांनी शांत केले. यातील पाच जणांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत लोकांच्या भावना त्यांच्यापुढे मांडल्या. ओला यांनी प्रकरणाची वस्तुस्थिती शिष्टमंडळाला सांगितली. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आ. सुनील केदार यांनी पोलीस स्टेशन गाठत पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आणि प्रकरणाची माहिती जाणून घेतली. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केदार यांनी केली. किशोर मोहोड, बाबा कोढे, अमित भोंगाडे, देवेंद्र पुणेकर, आदेश मोहोड यावेळी उपस्थित होते. रात्री ९ वाजतानंतरही पोलीस स्टेशनसमोरील गर्दी कमी होत नसल्याने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अतुल म्हेत्रे, तहसीलदार सचिन यादव तिथे पोहोचले. कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आरोपीला सायंकाळी ६.५० वाजता नागपूरला हलविले. तत्पूर्वी पोलिसांनी त्याचे बयान नोंदविले होते.शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कारउत्तरीय तपासणीनंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास बालिकेचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात लिंगा येथे आणण्यात आला. तिथे शोकाकूल वातावरण तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.लिंगा येथे श्रद्धांजलीचिमुकलीच्या हत्येमुळे गावात स्मशानशांतता पसरली होती तर अनेकांनी घरी चुलीच पेटविल्या नसल्याचे चित्र होते. गावातील नागरिकांनी लिंगा येथे हातात मेणबत्ती घेऊन चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांच्या मनात आरोपीविरुद्ध रोष जाणवत होता. यावेळी संगीता फलके, माया भाकरे, सीता भुजाडे, सुलोचना चौधरी, लीना किरपाल, दीपक पाल, रूपाली झाडे, बेबी फलके, गुंजन भुजाडे, मनोज पाल, विजय किरपाल, प्रफुल चौधरी, श्रावण पाल, प्रवीण परतेती, नीलेश चौधरी, गजानन भुजाडे, बल्लू सांभारे, अमोल पुरी, मुकेश पराडे, सुभाष किरपाल, संजय सुपारे, विनोद झाडे, निशांत भुजाडे, गजानन राऊत, आशिष राऊत, नितीन चौधरी, प्रकाश पाल, सुनील साव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.१४ वर्षापूर्वीच्या आठवणी झाल्या ताज्या१८ डिसेंबर २००५ साली तालुक्यातील लोणारा येथे कांचन मेश्राम या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून खून करण्याची घटना घडली होती. यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला होता. लोणारा व आता घडलेल्या घटनेचे गाव लिंगा या गावातील अंतर सहा ते सात किलोमीटर असून लोणारा येथील घटनेप्रमाणे लिंगा येथे घटनेची पुनरावृत्ती झाली असल्याचे नागरिकांचे मत आहे.
...तर आरोपीचे एन्काऊंटर करा! संतप्त नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 10:33 AM
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अथवा त्याचे हैदराबादसारखे एन्काऊंटर करा, अशी मागणी करीत तालुक्यातील नागरिकांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनसमोर कॅन्डल मार्च काढून निदर्शने केली.
ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा कळमेश्वर पोलीस स्टेशनला घेराव