लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या महिन्यात ९४१ नव्या रुग्णांची भर पडली तर गेल्या चार दिवसात १३१ रुग्णांची नोंद झाली आहे. पूर्वी एका विशिष्ट वसाहतीपुरता मर्यादित असलेला कोरोना आता सर्वच वसाहतींमध्ये थोड्या अधिक प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. आजार असूनही लक्षणे नसल्याने काही रुग्ण समाजात वावरत असण्याची दाट शक्यता आहे. यातच पावसामुळे सर्दी, खोकला व व्हायरलच्या रुग्णांत वाढ, हवेतल्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू एखाद्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता, सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी, यामुळे हा महिना कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात बेफिकिरी नकोच, काम असेल तर बाहेर पडा अन्यथा घरीच रहा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.कोरोनाचा संसर्गाला येत्या ११ जुलै रोजी चार महिने होत आहेत. नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला. त्या महिन्यात रुग्णांची संख्या केवळ १६ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९४१ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १५०५ वर पोहचली तर गेल्या चार दिवसात २३१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या १०० रुग्णांची नोंद ४४ दिवसानंतर झाली होती. मे महिन्यात शंभरी गाठण्याचे दिवस कमी होऊन ते ९ ते १२ दिवसावर आले. जून महिन्यात दर तीन ते चार दिवसानंतर नव्या १०० रुग्णांची भर पडली. या महिन्याच्या सुरुवातीलचा दोन दिवसाआड शंभरी गाठण्यात आली आहे. असे असताना काही लोक ‘लॉकडाऊन’ शिथिलतेचा फायदा घेत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहे. मास्क न बांधणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे आदींचे प्रमाण वाढले आहे. एकूणच कोरोनाविषयी बेफिकिरी वाढू लागली आहे. परिणामी, गेल्या महिन्यात चार दिवसात रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने आपल्याकडे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आजार होणारच नाही या भ्रामक कल्पनेत राहू नकाप्रसिद्धी फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, पावसाळ्यात कावीळ, गॅस्ट्रो, व्हायरल, मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात. या आजारात शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते, परिणामी कोरोनाचा धोका वाढू शकतो. यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोरपणे पालन पुढील दोन महिने करणे आवश्यक आहे. अन्यथा जुलैमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा. मला आजार होणारच नाही या भ्रामक कल्पनेत राहू नका, असेही ते म्हणाले.