निशांत वानखेडेनागपूर : सिमेंटचे जंगल झालेल्या शहरात वनसंपदेच अस्तित्व असणे म्हणजे ते शहर शुद्ध आणि सजीव असण्याचं लक्षण होय. अंबाझरी उद्यान आणि गोरेवाडा वनराई ही त्या अभिमानास्पद अस्तित्वाची ओळख होय. असंख्य प्रजातीची वृक्ष, प्राणी आणि पक्ष्यांची कलकल शहराला जिवंत रूप देणारे आहे. मात्र नागपूरकरांना अभिमान वाटावा असे हे दोन्ही उद्यान आज अस्तित्वात आहेत ते काही पर्यावरणप्रेमी आणि वनविभागाच्या प्रयत्नाने. मुरूम माफिया व लाकूड माफियांचे कारस्थान यशस्वी झाले असते तर दोन्ही वनसंपदा आज डोळ्यास दिसल्या नसत्या. प्रसिद्ध पर्यावरण मित्र डॉ. गोपाल ठोसर यांनी लोकमतशी बोलताना कटू आठवणींना उजाळा दिला. ८० च्या दशकातील काळ. अंबाझरीचा परिसर जंगलांनी व्यापला होता. मात्र हा परिसर आणखी एका गोष्टीने समृद्ध होता व ते म्हणजे गौण खनिज. म्हणूनच मुरूम माफियांची वक्रदृष्टी यावर होती. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून मुरूम काढण्यासाठी हा परिसर पोखरून काढला होता. हीच अवस्था गोरेवडा वनक्षेत्राची होती. लाकूड माफियांनी गोरेवाडा वनराई नष्ट करण्याचा चंगच बांधला होता. एवढेच नाही तर प्राणी, पक्ष्यांच्या शिकारीचाही सुळसुळाट या जंगलात झाला होता. अमर्याद वृक्षतोडीने हे जंगल जवळजवळ भकास झाले होते. ही गोष्ट या भागात पक्ष्यांचा नियमित अभ्यास करणारे पक्षीमित्र व पर्यावरणप्रेमी यांच्यासाठी असहनिय होती. त्यामुळे त्यांनी आपल्या परीने हे दोन्ही वनक्षेत्र वाचविण्यासाठी हवे ते प्रयत्न केले. महापालिका, जिल्हाधिकारी यांच्याकडे खेटा घातल्या. प्रसंगी माफियानी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पण राजकारणामुळे सर्वच प्रयत्न फसले होते. सर्व अधिकाऱ्यांनी यापुढे गुडघे टेकले होते. त्यामुळे आता दोन्ही वनसंपदेला वाचविणे शक्य नाही, म्हणून प्रत्येकजण निराश झाले. मात्र एक सकारात्मक गोष्ट यावेळी घडली. या काळात बावनथडी आणि कालीसराय धरणाचे बांधकाम सुरू झाले व मोठे वनक्षेत्र या धरणात गेले. या वनक्षेत्राच्या बदल्यात वनविभागाला ९०० हेक्टरचे अंबाझरी व १८०० हेक्टरचे गोरेवाडा देण्यात आले आणि या दोन्ही वनराईचे चित्र बदलले. वनविभागाने दोन्ही उद्यानाचा संपूर्ण परिसर सील केला आणि माफियांच्या हस्तक्षेप रोखण्यासाठी नियमित गस्त सुरू केली. मुरूम उत्खनन निषिद्ध करण्यात आले. गोरेवाडा वनक्षेत्राला फेंसिंग करण्यात आले. त्यावेळी झालेल्या या बदलामुळे दोन्ही वनक्षेत्र आज टिकून आहेत आणि नागपूरकर म्हणून गौरवास्पद ठरले आहेत. असंख्य प्रकारच्या प्रजातींचे अस्तित्व केवळ अंबाझरी उद्यानाचा विचार केल्यास येथे तब्बल २३८ प्रजातींचे पक्षी आढळून येतात. पक्षीमित्र नितीन मराठे यांनी यावर अभ्यासपूर्ण यादी तयार केली आहे. यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात येणाºया काही स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. याशिवाय काही कीटक व प्राण्यासह २४ प्रजातींचे सामान्य वृक्ष, १० प्रजातींचे औषधी वनस्पती तसेच गवत आणि आकर्षक वेळींचा समावेश आहे. मराठे यांच्या टीमने केलेल्या अभ्यासानुसार गोरेवाडा वनक्षेत्रात वाघ वगळता बिबट, चितळ, हरीण, गिर आदी २० ते २५ प्रकारचे वन्य प्राण्यांसह ६० ते ७० प्रजातीच्या प्राण्यांचे अस्तित्व आहे. विषारी व बिनविषारी असे बºयाच प्रकारचे सर्प आहेत. शिवाय २५० च्यावर प्रकारचे पक्षी, ३०० वर वृक्ष आणि वेगवेगळ्या प्रजातींचे मासे तलावात आहेत. हे क्षेत्र जैवविविधतेने संपन्न असल्याचे नितीन मराठे यांनी सांगितले.नुकताच भरतवन वनराईला वाचविण्यासाठी झालेला लढा आपना सर्वांना माहिती आहे. असाच लढा त्यावेळी गोरेवाडा व अंबाझरी उद्यान बचावासाठी झाला होता. अपेक्षेप्रमाणे त्याचा विकास झाला नसला तरी ही वनसंपदा टिकून आहे, हीच मोठी गोष्ट आहे. यासाठी अनेकांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. ही वनसंपदा टिकून राहणे आपल्या अस्तित्वासाठी महत्वाचे आहे. शक्यतो मानवी हस्तक्षेप थांबवा आणि ही संपदा सुरक्षित ठेवा.
- डॉ. गोपाल ठोसर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञगोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय झू पार्क बनविण्याची योजना कार्यान्वित आहे. त्याचे स्वागत आहे, मात्र सध्या येथे किती प्रजातींचे प्राणी, पक्षी व वृक्षांचे अस्तित्व आहे, याचा अभ्यास कुणी केला नाही. या वनक्षेत्रात असलेली जैवविविधता टिकविणे आवश्यक आहे. स्थानिक प्रजातींना नष्ट करून बाहेरून प्राणी आयात करण्यात अर्थ नाही.नितीन मराठे, पक्षी अभ्यासक