नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आगमन क्षेत्रात’ शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. अचानक या भागातील छतातून पीओपीचे तुकडे खाली पडले. या जागेतून पावसाचे पाणी गळू लागले व फरशीवर पसरले. या घटनेच्या वेळी काही प्रवासी सुदैवाने बचावले. एक प्रवासी मात्र किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
दुसरीकडे विमानतळ प्रशासनाचा दावा आहे की, छताच्या मेंटनन्सचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र, या घटनेमुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विमानतळ प्रशासनाला मेंटनन्सचे काम करण्याची गरज का भासली, तसेच दुरुस्तीचे काम करताना आवश्यक खबरदारी का घेतल्या गेली नाही.
शहरात गुरुवारी रात्री सरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम राहिला. या पावासाचा फटका विमानतळालाही बसला. आगमन क्षेत्रातील छताला लागलेल्या पीओपीचे तुकडे खाली पडू लागले. यावेळी फ्लाइट ६ ई-७४२७ इंदूर- नागपूरचे प्रवासी बाहेर निघत होते. प्रत्यक्षदर्शीनुसार अचानक पीओपीचे तुकडे पडल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झाला, तर बाकी सुदैवाने बचावले. विमानतळ प्रशासन व विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात पथकाने मात्र याला नकार दिला आहे.
मेंटनन्सचे काम सुरू होते
- नागपूर विमानतळाच्या ज्या भागात शुक्रवारी पीओपीचा काही भाग कोसळला व तेथून पाणी गळू लागले त्या भागात मेंटनन्सचे काम सुरू होते. यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आली होती. मेंटनन्सचे काम सुरू असताना ही घटना घडली. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तेथे आधीच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
- आबिद रुही, विमानतळ संचालक