संजय रानडे
नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर गेटवरून गाईड्स आणि चालकांकडून मोबाईलचा गुपचुप वापर होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यापुढे असा प्रकार आढळला तर संबंधित गेटच वर्षभरासाठी बंद केले जाईल, असा इशारा उपसंचालक (बफर झोन) जी. गुरुप्रसाद यांनी दिला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मोहुर्ली, पळसगाव, खडसांगी, शिवणी, चंद्रपूर आणि मूल या सहा रेंज आहेत. यातून पर्यटकांना आत सोडले जाते. आत प्रवेश करताना मोबाईलचा वापर करू नये, असे निर्देश आहे. तरीही याकडे पाठ फिरवून जिप्सी चालक आणि मार्गदर्शक बंदी असतानाही सेलफोन बाळगतात. वाघ, बिबट्या अस्वल दिसल्यास ते इतर वाहनांना माहिती देतात. याचा परिणाम जिप्सींची ओव्हरस्पिडिंग आणि गर्दीत जास्त होतो. नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती मिळाली असल्याचे गुरुप्रसाद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या प्रकारावर आळा घालण्यासाठी २१ मार्च रोजी गुरुप्रसाद यांनी सर्व सहाही श्रेणी अधिकाऱ्यांना एक पत्र दिले असून, सफारीदरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात सेलफोन नेऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यास सुचविले आहे. यापुढे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वारावरून एक वर्षासाठी पर्यटन बंद करण्यात येईल, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
या प्रकल्पाला नियमितपणे भेट देणारे वन्यजीव छायाचित्रकार अराफत सिद्दिकी म्हणाले, जंगलात जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांकडून मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाचे आपण अंशतः समर्थन करतो. वाघ किंवा अन्य प्राणी दिसणे हा वेळेचा योग असतो. त्यामुळे इतरांना घटनास्थळी बोलावणे अयोग्य आहे. एखाद्या पर्यटक वाहनात सेलफोनचा वापर झाल्यास समस्या निर्माण होऊ शकते.
पर्यटक अमित खापरे म्हणाले, व्याघ्र प्रकल्पालगतच्या रिसॉर्ट चालकांना ही बाब माहीत असली तरी व्यवसायाचा विचार करून यावर कुणीही बोलण्यास तयार नसतात. जिप्सी चालक, गाईड्स आणि पर्यटकांना विचारात न घेता हा एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. वनविभागाने एकतर्फी नियम लागू केल्यास गाईड आणि ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.
ताडोबात बंदी आधीपासूनच
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी दरम्यान सेलफोन घेऊन जाण्यास फार पूर्वीपासूनच पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना त्यांचे मोबाईल बंद बॉक्समध्ये ठेवावे लागतात. सफारीनंतर ते परत केले जातात.
...