नागपूर : महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असून, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. नेहमीच सर्व घटक पक्षांना दुय्यम दर्जाची वागणूक तिन्ही पक्षांकडून मिळत आहे. तिन्ही पक्षांनी घटक पक्षांची वेळीच दखल घेतली नाही, तर महाविकास आघाडीमधील ४० पेक्षा जास्त असलेले पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.
युती सरकार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील ४० पेक्षा जास्त पक्षांना सोबत घेऊन युती सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर राज्यव्यापी तब्बल चार महायात्रा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन काढली. काँग्रेस पक्षाने तर मागील पाच वर्षांत युती सरकारच्या विरोधातील सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाची साथ घेतली. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्याचा विसर पडत आहे, असा आरोप करीत २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला हे सुद्धा काँग्रेसने विसरू नये, असा टोलाही लगावला.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची विशेष बैठक बोलावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावे की नाही आणि पुढील वाटचाल काय यावर निर्णय घेतला जाईल, असा इशारा जयदीप कवाडे यांनी दिला आहे.