निशांत वानखेडे
नागपूर : प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील हजारो झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने सामान्य नागरिकांमध्येही असंतोष वाढत चालला आहे. एक तर प्रकल्पासाठी पर्यायी व्यवस्था करा किंवा प्रकल्पच रद्द करा, ही मागणी जोर धरत आहे. जनभावना दुर्लक्षित केली तर झाडांना व तेथील पशुपक्ष्यांना वाचविण्यासाठी आम्हालाही ‘चिपको आंदोलन’ करावे लागेल, असा इशारा सामान्य नागरिकांनी दिला.
अजनीमध्ये होऊ घातलेल्या वृक्षतोडीविरोधात जनमानसामध्ये भावना निर्माण होत आहे. रविवारी नागरिकांनी अजनी परिसरात वृक्षतोडीविरोधात मूक प्रदर्शन केले. यावेळी लोकमतने नागरिकांची भावना जाणून घेतली.
जंगलाच्या संवर्धनासाठी सामान्य नागरिकांनी कधी काळी जीवाची बाजी लावली हाेती. ही वेळ आमच्यावरही आली आहे. अजनीतील वृक्षांचे संवर्धन करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही मागे हटणार नाही. प्रसंगी वृक्षताेड करायला येणाऱ्या यंत्रणेविराेधात आम्ही चिपकाे आंदाेलन करू.
- अच्छमा जाेसेफ
दक्षिण नागपूर परिसरात मेडिकल व अजनीचा भाग एकमेव ग्रीन पाॅकेट आहे. येथील हजाराे झाडांची कत्तल करून सरकार कशाचा विकास साधणार आहे. ही झाडे शुद्ध हवा देतात म्हणून लाेकांचे आराेग्य चांगले आहे. आराेग्य चांगले राहणार नाही तर विकासाचे काय काम.
- श्रेयस पांडे, विद्यार्थी
ही झाडे शहराचे फुप्फुस आहेत. अजनीच्या या हजाराे झाडांमुळेच येथील वातावरणात गारवा आहे. हे केवळ मनुष्यासाठी नाही तर हजाराे पक्ष्यांचाही आधार आहेत. हीच जर राहिली नाही तर हे मुके पक्षी जाणार कुठे. या गाेष्टीचाही विचार व्हावा.
- परम कुकरेजा, विद्यार्थिनी
हळूहळू हे शहर सिमेंटच्या जंगलात रूपांतरित हाेत आहे. आतापर्यंत थाेडी फार वृक्षवल्ली टिकून असल्याने ज्येष्ठ झालेली पिढी शुद्ध हवा घेत आहे. झाडे वाचविण्याची गरज असताना ती ताेडली जात आहेत. झाडेच राहिली नाही तर आमच्या आणि येणाऱ्या पिढीची काय अवस्था हाेइल, याचाही जरा विचार करा.
- मेहा कांबळे, विद्यार्थिनी
एवढ्या माेठ्या प्रमाणात वृक्षताेड हा विकास करण्याचा नाही तर शहर भकास करण्याचा प्रकार आहे. या झाडांमुळे येथे तापमान कमी आहे, परिसरात जलस्तर अधिक आहे. ही झाडे कापली जातील तर विपरीत परिणाम हाेतील.
- कुवरसिंह मेहराेलिया
अजनीची वनराई तयार व्हायला दीडशे-दाेनशे वर्षे लागली. प्रकल्पासाठी झाडे कापायला एक दिवसही लागणार नाही. पण अशी वनसंपदा निर्माण करायला कित्येक वर्षे लागतील. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत.
- भीमराव दुपारे, ज्येष्ठ नागरिक
अगदी जन्मापासून या रेल्वे क्वॉर्टरमध्ये माझे जीवन गेले. आज वय ८६ वर्षे आहे. ही वृक्षवल्ली माझ्या जीवनाशी जुळली आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर नष्ट करणार असल्याचे कळल्यावर दु:ख वाटत आहे. मात्र आम्ही ही काॅलनी वाचविण्यासाठी लढा देऊ.
- शेख हुसेन, ज्येष्ठ नागरिक
या वनराईमुळेच शुद्ध हवा मिळते. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहे. झाडेच नष्ट झाली तर शुद्ध हवेसाठी शोध घ्यावा लागेल. ऑक्सिजन सिलेंडर लावून फिरण्याची पाळी येईल.
- शेख कमर