-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:06 PM2018-08-13T12:06:06+5:302018-08-13T12:06:34+5:30

जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

Then we can cancel the Raffel contract; Priyanka Chaturvedi claims | -तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘डील’ नव्हे तर मोठा भ्रष्टाचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राफेल विमान करारावरून काँग्रेसने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हा करार नाही तर एक मोठा भ्रष्टाचारच आहे. जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. नागपुरात ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रविवारी वरील वक्तव्य केले.
‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमाला ‘नागपूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, उपाध्यक्ष जोसेफ राव, सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी, विशाल मुत्तेमवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारत व फ्रान्स यांच्यात २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. अगोदर केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्येक विमान ६७० कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर नेमकी किंमत सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले व अखेर गोपनीयतेचा हवाला देत रक्षामंत्र्यांनी काहीच माहिती दिली नाही. जो फायदा देशातील ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ला मिळायला हवा होता, तो आता फ्रान्समधील ‘डेसॉल्ट’ व ‘रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीज’ला मिळणार आहे. जी कंपनी सायकलदेखील बनवत नाही, तिला विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या एकूण करारामुळे बाहेरील कंपन्यांना विविध माध्यमातून एक लाख करोड रुपयांचा फायदा होणार आहे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर काय, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राफेल प्रकरणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी संचालन केले तर जोसेफ राव यांनी आभार मानले.

‘त्यांच्या’साठी ‘सोशल मीडिया’च संहारक ठरेल
२०१९ मधील निवडणुकींच्या प्रचारासाठी आम्ही केवळ ‘सोशल मीडिया’वर अवलंबून नाही. आम्ही सर्व माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या ‘ट्रोल आर्मी’वर त्यांच्याच मंत्री सुषमा स्वराज यांनी टीका केली होती. ज्या ‘सोशल मीडिया’मुळे हे लोक वर आले, तेच माध्यम त्यांच्यासाठी संहारक ठरेल, असे प्रतिपादनदेखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

शिवसेनेवर साधला निशाणा
राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचा खरा चेहरा समोर आला. महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असलेल्या एका पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी तटस्थ राहून ते आपल्या जबाबदारीपासून दूर पळाले, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचे थेट नाव न घेता निशाणा साधला. राफेल करारामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा काही केंद्रीय मंत्र्यांचादेखील सहभाग असल्याने त्यांच्यावरदेखील जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेदेखील त्या म्हणाल्या.

नेमके नुकसान तरी किती?
राफेल करारामुळे देशाचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याची बाब यावेळी समोर आली. या करारामुळे देशाचे थेट ४१ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. तर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी मागील आठवड्यात यामुळे ४८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. याबाबत चतुर्वेदी यांना विचारणा केली असता सरकारकडून दिलेल्या आकडेवारीवरून आम्ही नुकसान सांगत असल्याचे स्पष्ट केले. मात्र सरकारने आकडेवारीच जाहीर केली नसल्याने नेमके नुकसान झाले तरी किती, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Then we can cancel the Raffel contract; Priyanka Chaturvedi claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.