नागपूर : रंगभूमीवर बदल होत राहणे सातत्यानेच घडते आहे. ते जिवंतपणाचे लक्षण आहे. पूर्वी रंगभूमीवर दु:ख होतेच आता अस्वस्थता आहे पण तरीही अनेक मानवी भावनांच्या कंगोऱ्यांना भिडणे शिल्लक आहे, असे मत जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित ‘रंगभूमीचे बदलते स्वरूप’ विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.धरमपेठ राजाराम वाचनालय आणि वैदर्भीय रंगकर्मी आघाडीच्यावतीने हा कार्यक्रम वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. रंगकर्मींच्या अभिव्यक्तीला इतर कलांच्या तुलनेत जास्त मोकळीक आहे़ त्याचा लाभ घेणे महत्त्वाचे ठरते़ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग रंगकर्मींनी वेगळ्या विषयवास्तूसाठी केला तरच भविष्यात नाट्यकला टिकणार असल्याचे परखड मत ज्येष्ठ नाट्यलेखक दिनकर बेडेकर यांनी व्यक्त केले़ आता रंगभूमीवर मानवी जगण्याचे नवनवे संदर्भ वेगळ्या अर्थाने मांडणे गरजेचे आहे. एक प्रकारची निराशा आहे पण ती सकारात्मकतेने घ्यायली हवी, असे बेडेकर म्हणाले. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश लुंगे म्हणाले, पूर्वी दु:ख होते़ अस्वस्थता नव्हती़ संवादाची माध्यमे कमी असली, तरी भक्कम संवाद होत होता़ ज्यांना संवाद करणे जमायचे नाही, ते मनोरंजनाच्या माध्यमांकडे वळायचे़ त्यामुळेच नाटकांना, नाटकांच्या तालमींना प्रचंड गर्दी होत असे़ आता त्याउलट झाले आहे़ नाट्य हे थेट संवादाचे माध्यम आहे़ हा संवाद साधण्याचा प्रयत्न रंगकर्मींकडून होणे गरजेचे आहे तरच नाटक टिकेल. किशोर भांदककर म्हणाले, काळाप्रमाणे रंगभाषा बदलत गेलीय़ मर्ढेकर, तेंडूलकर, आळेकर यांनी मध्यमवर्गींयांची भाषा रंगभूमीवर आणली़ आता त्यातही बदल होतेय़ अमूर्त नाट्यसूत्र मूर्ततेत उतरवण्याची कला रंगकर्मींनी करणे, महत्त्वाचे ठरतेय़ आता ते होत आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी डॉ़ सुषमा देशमुख लिखित ‘बाबा झाले आई’ या नाटकाचे उद्घाटन करण्यात आले़ हे नाटक २१ एप्रिल रोजी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सादर होणार आहे़ याप्रसंगी राज्यनाट्य स्पर्धेत द्वितीय ठरलेल्या ‘विठाबाई’ नाटकाचे लेखक , दिग्दर्शक व अभिनेते संजय जीवने यांचा सत्कार माधुरी बेडेकर व महेश पातुरकर यांच्या हस्ते करण्यात आला़ कार्यक्रमाचे संचालन सलिम शेख यांनी केले़ आभार पूजा पिंपळकर यांनी मानले़ (प्रतिनिधी)
रंगभूमीवर दु:ख आहेच, अस्वस्थताही वाढली
By admin | Published: March 29, 2015 2:35 AM