नागपूर : महापालिका प्रशासनाने शहरातील काही खासगी हॉटेल्सला कोविड केअर सेंटरची परवानगी दिली. या सेंटरमध्ये डॉक्टर्स आणि पॅरानर्सिंग स्टाफही हॉटेल व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिला. पण या सेंटरला ऑक्सिजन अथवा रेमडेसिविर मागू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले. या केअर सेंटरमधील रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता असल्याने डॉक्टर्स प्रीस्क्रीप्शन देत आहेत, मात्र औषधांच्या दुकानात इंजेक्शन मिळत नसल्याने ब्लॅकमध्ये घेण्याची तडजोड करावी लागत आहे.
नियमानुसार रेमडेसिविर औषधांवर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण आहे. औषधांची आवश्यकता असल्यास संबंधित रुग्णालयाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद केल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येतो. पण कोविड केअर सेंटरला त्याची परवानगी नाही. शहरातील २३ खासगी हॉटेल्सनी कोविड केअर सेंटर तयार केले आहेत. काही हॉटेल्समध्ये व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध केली आहे. डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफही उपलब्ध आहे. पण रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांना आवश्यक असलेले औषध रुग्णांना देता येत नाही. नागपुरातील एका कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी रेमडेसिविरचे प्रीस्क्रीप्शन लिहून दिले. त्याच्या नातेवाईकांनी औषधाच्या दुकानात विचारणाही केली, परंतु औषध मिळाले नाही. त्याने कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरांकडे कुठे मिळेल याची विचारणा केल्यावर ते म्हणाले की, तुम्ही कुठूनही आणा आम्ही लावून देऊ. आम्हाला मनपा प्रशासनाने औषध उपलब्ध करून देण्यास नकार दिला आहे. शहरात औषध उपलब्ध नाही. प्रशासन कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरांचे प्रीस्क्रीप्शन ग्राह्य धरीत नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक ब्लॅकमध्ये रेमडेसिविर उपलब्ध आहेत का? याचा शोध घेत आहेत.