मंगेश व्यवहारे
नागपूर : एस.टी. महामंडळाची बससेवा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची एकमेव सुविधा आहे. परंतु, अजूनही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत. आम्हाला आता परीक्षेसाठी शाळेतच मुक्काम करावा लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
सध्या शाळांमध्ये बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. प्रॅक्टिकल व सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. प्रवासाची सुविधा नसल्याने सराव परीक्षेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाली आहे.
- माझ्या गावातून शाळा ही १५ ते १६ किलोमीटर पडते. आमच्यासाठी एस.टी. ही एकमेव साधन आहे. परीक्षेच्या काळात बस उपलब्ध नसेल, तर परीक्षेच्या कालावधीत शाळेच्या परिसरातच थांबावे लागणार आहे.
आरती मस्के, विद्यार्थिनी
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बसेस नसल्यामुळे चांगलीच अडचण होत आहे. परीक्षेच्या काळात खऱ्याअर्थाने सरकारने परीक्षा सेवा बसेस सुरू करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीही खूप नाजूक असल्याने विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क बससेवा सुरू कराव्यात.
- युवराज शंकरपुरे, मुख्याध्यापक, उदय विद्यालय, देवलापार
- बस हे एकमेव साधन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आहे. येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेऊन, लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याची गरज आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. बससेवा सुरू नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतात.
मुरलीधर मानकर, वामनराव मानकर हायस्कूल, खामली, ता. काटोल
- परीक्षेच्या काळात एस.टी. सुरू न झाल्यास हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. शासनाने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. लवकरात लवकर बससेवा सुरू करण्यासंदर्भात महामंडळाला निवेदन देणार आहोत.
अनिल गोतमारे, जिल्हाध्यक्ष, वि. मा. शि. संघ, नागपूर जिल्हा
- एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे रुजू झालेले कर्मचारी आणि लाईन चेकिंगवरील कर्मचारी अशा मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामीण भागात ३० टक्के बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्यानंतर ग्रामीण भागातील उर्वरित सेवा सुरू करण्यात येईल.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, नागपूर विभाग