लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत असून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. देशात कोविड-१९ ची परिस्थिती पाहता देशांतर्गत विमान सेवा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता नाहीच. विमानांच्या उड्डाणासंदर्भात सरकार कोणताही निर्णय घाईने घेण्यास तयार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपल्यानंतर विमानांचे उड्डाण सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. नागपूर विमानतळ प्रशासनाने या संदर्भात तयारीही सुरू केली होती. सुरक्षेसंदर्भात निर्देश देण्यात आले होते. मात्र राज्य शासनाने लॉकडाऊन वाढविल्याने जूनपासूनच विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात विमान सेवा सुरू होणार नाही, याचा अंदाज विमान कंपन्यांना होता. त्यामुळे कंपन्यांच्या साईटवर कोणत्याही मार्गावरील विमानाच्या तिकिटाची विक्री सुरू झाली नव्हती. राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयानंतर मे महिन्यात विमान सेवा सुरू होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारची प्रवासी सेवा वगळता वैद्यकीय सेवा, एअर अॅम्ब्युलन्स, सुरक्षा उपकरणे आणि सुरक्षा कारणांनी ये-जा करणाऱ्या विमानांना परवानगी आहे. देशातील ग्रीन झोनमधील शहरांमध्ये विमान सेवा सुरू करण्याचा सल्ला सरकारने दिला होता. पण अनेक विमानतळ रेड झोनमध्ये असल्याने कंपन्यांनी उड्डाण सुरू करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
नागपुरात विमानांचे सध्या उड्डाण नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:34 PM