कोविड केअर सेंटरमध्ये ८९ रुग्ण
नागपूर : जिल्ह्यात १९ कोविड केअर सेंटर असून सध्या ८९ कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. यात शहरातील आमदार निवास, कारागृह, वनामती सेंटरमध्ये शून्य असून व्हीएनआयटी सेंटरमध्ये सात तर पाचपावली सेंटरमध्ये १६ रुग्ण आहेत. ग्रामीणमधील नागपूर ब्लॉकमध्ये शून्य, पारशिवनी ब्लॉकमध्ये तीन, काटोल ब्लॉकमध्ये २०, कळमेश्वर ब्लॉकमध्ये २०, हिंगणा ब्लॉकमध्ये १३, सावनेर ब्लॉकमध्ये शून्य, मौदा ब्लॉकमध्ये शून्य, रामटेक ब्लॉकमध्ये सात, उमरेड ब्लॉकमध्ये दोन तर नरखेड ब्लॉकमधील कोविड केअर सेंटरमध्ये शून्य रुग्ण आहेत.
अजनी क्वॉर्टर परिसर झाले कचरा डम्पिंग यार्ड
नागपूर : नवीन बाभुळखेडा येथून अजनी क्वॉर्टर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जयभीमनगर, नवीन बाभुळखेडा व अजनी क्वॉर्टरचे नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. परिणामी, हा परिसर कचरा डम्पिंग यार्ड सारखा झाला आहे. धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
रामेश्वरी रोडवर पुन्हा मांस विक्रीची दुकाने
नागपूर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील रस्त्यावर व कडेला भरणाऱ्या भाजीबाजारापासून ते मांस विक्रीच्या दुकानांवर कारवाईचा सपाटा लावला होता. परंतु त्यांची बदली होताच रस्त्यांवर बाजार भरणे सुरू झाले. विशेषत: रामेश्वरी रोडवर मांस विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. याला मनपाच्या संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.