लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पश्चिम मतदार संघात एकूण ३ लक्ष ६९ हजार १२९ मतदार आहेत. यापैकी २८,२९३ एवढ्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्यामुळे हे फोटो गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे मतदारांकडून फोटो गोळा करणार आहेत. मतदार यादीत छायाचित्र नाहीत. त्यांनी ३० जूनपर्यंत आपले फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी हेमा बढे यांनी केले आहे.
मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र असलेल्या अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असून मतदार यादीमध्ये फोटो नाही अशा मतदारांनी ३० जून पर्यंत आपले फोटो जमा करावे. अनेक मतदार हे स्थलांतरित असल्याचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे निदर्शनात आले आहे. हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) स्थलांतरित मतदारांच्या घरी तीन वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी जाऊन आले आहेत. अशा स्थलांतरित मतदारांच्या ते मतदार यादीवर दिलेल्या पत्त्यांवर आढळून आले नाहीत. तेथे राहत नसल्याबाबत त्यांनी पंचनामा केला आहे. या पंचनाम्यांच्या याद्या तयार करून त्या सार्वजनिक स्वच्छतागृह, तहसिल कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांचे कार्यालयीन संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. नागपूर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर स्थलांतरित मतदारांच्या नावाची यादी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे.
मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांनी नागपूर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जाऊन आपले नाव या यादीत नाही याची खात्री सर्व मतदार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधींनी करून घ्यावी.
वगळणी करावयाच्या मतदारांचे यादीमध्ये आपले नाव असल्यास आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे तात्काळ जमा करावे. तसेच या यादीतील एखाद्या मतदाराला आपण ओळखत असाल तर त्या मतदारांचा रंगीत फोटो तात्काळ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा. ३० जून पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे छायाचित्र जमा न झाल्यास यादीतील मतदार हे स्थलांतरित आहे, असे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, असे मतदान नोंदणी अधिकारी हेमा बढे यांनी कळविले आहे.