नागपूर : प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन, ‘स्व’चे स्पष्ट भान, राष्ट्राबद्दलच्या कल्पना व देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक संघात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघ-ग्रंथालयाच्या वतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘संस्थांची शतकोत्तर आव्हाने’ या व्याख्यानमालेचा समारोप झाला. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात मंगळवारी झालेल्या व्याख्यानमालेच्या समारोपीय समारंभाला ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते. नरकेसरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या सुनील किटकरूलिखित ‘वार्ता ईशान्य भारताची’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
देशापुढे आज अनेक आव्हाने आहेत. देशात मोठ्या प्रमाणात विविधता असून, या सगळ्यांना जोडण्यासाठी, संघटित करण्याची मोठी जबाबदारी समाजावर आहे. समाजानेही आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार, संस्था, संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शतकाकडे वाटचाल करीत असून, विपरीत परिस्थितीत सर्वांना जोडण्याचे काम सातत्याने करीत आला आहे. धेयनिष्ठा, आत्मीयता, अनुशासन आणि आपपरभाव नसणे, हा संघाचा स्वभाव असून, ज्या उद्देशाने डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली तो उद्देश कार्यपूर्तीपर्यंत तसाच राहील, असा विश्वास मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केला.
विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र डोळके यांनी प्रास्ताविक, संचालन विवेक अलोणी यांनी केले. आभार डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी मानले.
ग्रंथालयाचे केले कौतुक
विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासला मोहन भागवत यांनी भेट दिली. आज मंगळवारी रंगनाथन दिन असल्यामुळे मोहन भागवत यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व प्रा. डॉ. सुधीर बोधनकर यांच्यासह भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, भारताचे संविधान या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. त्यांनी ग्रंथालयाची पाहणी केली व येथील ग्रंथसंपदेचे कौतुक केले.
........