लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शत्रू दुबळा असला तर त्याच्यावर दबाव बनविणे शक्य असते. पण शत्रू बलशाली असला तर त्याच्याशी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. राजकारणात त्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. असे नसते तर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा गवगवा करणाऱ्या सरकारने चीनबाबत असाच कणखरपणा दाखविला असता. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आहे का? कोणत्याच सरकारला हे धारिष्ट्य करता आले नाही. उलट देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंना आपल्यातील शक्ती व दुबळेपणाची जाणीव होती व त्यांनी काश्मीर व चीनबाबत योग्यच भूमिका घेतली, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक व साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने ‘काश्मीर प्रश्न, चीन व नेहरू : एक माणूस’ या विषयावरील चिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी उपस्थित होते. द्वादशीवार यांनी सुरुवातीला काश्मीर व नंतर चीनच्या प्रश्नासह पं. नेहरू यांचे राजकीय पैलू उलगडले. नेहरूंवर सातत्याने टीका करणाऱ्यांनी कधी देशाच्या लष्कराच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही. शीखांचे एकमेव साम्राज्य राहिलेल्या काश्मीरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती त्यांनी दिली. सुफी संतांच्या धर्मप्रसाराने हा प्रदेश मुस्लिमबहुल झाला होता. देशाच्या फाळणीनंतर खºया अर्थाने काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला. नेहरूंना या प्रदेशाबाबत ओढा होता. कुणाकडे जायचे हा निर्णय येथील जनता व संस्थानिकांच्या मताने घ्यावा, अशी प्रत्येकाची भूमिका होती. पण धर्मश्रद्धा या राजकीय भूमिकेवर वरचढ असतात याची जाणीव असलेल्या नेहरूंनी हा प्रश्न सामंजस्याने हाताळला. ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने फौजा पाठविल्या तेव्हा काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली. त्यावेळी पं. नेहरू यांनी मुत्सद्देगिरी दाखवित विलिनीकरणाची अट त्यांच्यासमोर घातली. वास्तविक फाळणीनंतर केवळ लोक इकडून तिकडे गेले नाही तर पैसा, लष्कर व शस्त्रास्त्रांचेही समान वाटप झाले. हे युद्ध १४ महिने चालले. नेहरूंनी सन्माननीय तडजोड काढण्यासाठी हा प्रश्न नंतर युनोमध्ये मांडला. यामुळे काश्मीरबाबत भारत आजही वरचढ असल्याचे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच तटस्थ राष्ट्रामध्ये भारताचा दबदबा वाढला होता. नेहरूंची लोकप्रियता व आदर वाढला होता. रशिया आणि अमेरिका भारताचे मित्र झाले. प्रचंड शक्तिशाली असूनही हा सन्मान आपल्याला मिळत नाही, ही गोष्ट चीनला खटकत होती. त्यामुळे भारताला नामोहरम करून अमेरिकेला आपली ताकद दाखविण्याची खुमखुमी चीनला होती. त्यावेळी भारताचे सैन्य ३ लाख तर चीनचे ३५ लाख एवढे होते. त्यामुळे चीनशी युद्ध करणे म्हणजे आपल्या सैन्याचा बळी देण्यासारखे आहे, ही जाणीव नेहरूंना होती. ते सातत्याने युद्धापेक्षा चर्चेवर अधिक भर देत होते. मात्र चीनने कुरघोडी करीत भारताविरोधात युद्ध पुकारले. अर्थातच भारताचा पराभव झाला. पराभवाची जबाबदारी पं. नेहरू यांनी स्वत: स्वीकारली. मात्र देशाचा पराभव झाला असला तरी देश पुन्हा एकसूत्राने बांधला गेला. यानंतर मात्र चीनने कधीही भारतावर आक्रमण केले नाही, ही गोष्ट द्वादशीवार यांनी अधोरेखित केली. वास्तविक गांधीजींची हत्या व १९५० ला सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर नेहरू एकटे पडले होते. पण त्यांनी प्रगल्भपणे देशाला पुढे नेणारे निर्णय घेतले. ते खºया अर्थाने भारताचे भाग्यविधाते आहेत, असे मनोगत द्वादशीवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी केले.