लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी लिहिलेल्या ‘विदर्भ राज्य निर्मिती व महत्त्वाचे दस्तावेज’ या पुस्तकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, यावर संभ्रम कायम आहे. यासंदर्भात अद्याप निर्देश जारी झाले नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.विद्वत परिषदेने या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे विदर्भ कनेक्ट संस्थेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांच्या नेतृत्वात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली होती. शिष्टमंडळात संघटन सचिव दिनेश नायडू, कोषाध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, कार्यकारी सदस्य अॅड. नीरज खांदेवाले व संदेश सिंगलकर यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने निवेदन सादर करून पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले होते. तसेच, राज्यशास्त्र अभ्यासक्रमात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी व इतिहासावर एक प्रकरण आहे, याकडे लक्ष वेधले होते. हे पुस्तक संशोधनकर्ते व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सिद्ध होईल, असेही सांगितले होते. त्यानंतर कुलगुरूंनी या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून राज्यशास्त्र अभ्यासक्रमात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते, असे बोलले जात आहे. परंतु, अधिकाऱ्यांनुसार यासंदर्भात अद्याप निर्देश जारी झाले नाहीत.
श्रीहरी अणे यांच्या पुस्तकावर संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:33 PM