नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. विशेष म्हणजे, लर्निंग लायसन्सचा संगणक चाचणी परीक्षेसाठी उमेदवार अपॉईंटमेंट घेऊन येतात, त्यानंतरही गर्दी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात अहे. दलालांकडून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचाही तक्रारी आहेत.
दिवाळीनंतर दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. तरीही रोज ४०० ते ५०० रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर पाळणे व वारंवार हात धुण्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला जात आहे. परंतु वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेवणाऱ्या आरटीओ कार्यालयाला याचा विसर पडल्याचे चित्र आहे.
आरटीओमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना सोयीचे जावे यासाठी ऑनलाईन अपॉईटमेन्टची सेवा सुरू करण्यात आली. असे असताना शहर कार्यालयात, अपॉईटमेन्ट घेऊन येणाऱ्यांना दोन ते तीन तास थांबावे लागते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने, स्वत: लर्निग लायसन्स विभागाला भेट दिली असता, संगणक चाचणी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी दारावर गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंग नियम पायदळी तुडवला गेला होता. येथे सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी नसल्याने एक दलाल गर्दीला आवरताना दिसला. एका, उमेदवाराला बोलते केले असता तो म्हणाला, १२ वाजताची अपॉईटमेन्ट असताना १.३० वाजले तरी नंबर लागला नाही. परंतु ज्यांच्या लर्निंग लायसन्सवर ड्रायव्हिंग स्कूलचा स्टॅम्प आहे किंवा विशिष्ट कोड आहे त्यांना प्रथम आत बोलविले जात असल्याची तक्रारही केली.