नागपूर : मनोरंजनाचे साहित्य खूप लिहिले गेले, वाचले गेले... आता, त्यापलीकडे जाऊन दु:खाला वेदनेचे रूप देणाऱ्या साहित्याची निर्मिती होणे, ते लिहिले जाणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हाधिकारी आर. विमला, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, विष्णू मनोहर, डॉ. दत्तात्रय वाटमोडे, डॉ. विजया मारोतकर, विशाला देवतळे, डॉ. वडते, डॉ. भारती खापेकर उपस्थित होते.
जाती-जातीचे साहित्य खूप लिहिले गेले. मात्र, आता जे माझे तेच तुझे असा भाव निर्माण करणारे सेक्युलर साहित्य निर्माण व्हावे. सेक्युलर साहित्य, हा शब्दच या संमेलनाची देणगी असल्याचे कौतुक डॉ. शरद निंबाळकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी डॉ. सुरेश खोंडे, आशा पांडे, डॉ. स्मिता वंजारी, मनोज बालपांडे, वैशाली कोहळे, मंगेश बावसे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अरुणा भाेंडे यांनी केले तर आभार विजया मारोतकर यांनी मानले.
अभिजात भाषा, हा भगव्याच्या अस्मितेचा सवाल - सबनीस
मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळावी, असे शेकडो प्रस्ताव सादर झाले तरीदेखील दिल्ली हादरली नाही. अभिजात भाषेची मागणी ही काळजाची आहे आणि काळीज दिल्लीला हलवणारे असेल तर मोदींनाही ती मागणी पूर्ण करावीच लागेल. शेवटी मराठी हा लोकमान्य, सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याच्या अस्मितेचा सवाल असल्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.
साहित्य म्हणजे, रिकामटेकडेपणाचे कार्य नव्हे - शोभणे
वर्तमानात आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे रिकामा वेळ म्हणून अनेकांना साहित्यिक होण्याची हौस लागली आहे. मात्र, साहित्य हे रिकामटेकडेपणाचे काम नसून साहित्यनिर्मितीत गुंतण्यापूर्वी आधी साहित्य वाचन महत्त्वाचे असल्याचे मत कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी गायले गाणे
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी समारोपीय सत्रात आपल्या भाषणाच्या वेळी ‘पल पल खुशियो से भरा हैं जीवन, हर मोड पे मिल जाते हैं बाहे फैलाये, छोटी छोटी खुशियाँ’ ही स्वरचित कविता व ‘जीवलगा’ हे चित्रपट गीत सादर करत स्वत:तील साहित्य व कलारसिकतेचे दर्शन घडविले.