निशांत वानखेडे
नागपूर : सरकारने नागपूरसह विदर्भातील शहरात उष्णतेशी लढण्यासाठी ‘उष्णता कृती याेजना’ (हिट ॲक्शन प्लॅन) तयार तर केला आहे. पण यातील सूचना, बदल क्रियान्वित करण्यासाठी निधीबाबत स्पष्टता नसल्याने अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित हाेते आहे. शिवाय स्थानिक परिस्थितीनुसार वैज्ञानिक अभ्यासाचा आधार नसल्याने याेजनेचा लाभ हाेईल की नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटा जीवघेण्या तर असतातच पण आर्थिकदृष्ट्या हानीकारक असतात. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने एचएपी (हिट अॅक्शन प्लॅन) तयार केले आहेत. या एचएपीचे वास्तव जाणून घेण्यासाठी सेंटर फाॅर पाॅलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थेने देशभरात तयार केलेल्या उष्णता कृती याेजनांचे मूल्यांकन केले आहे. यात १८ राज्यातील ३७ एचएपीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या याेजनांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे सीपीआरचे आदित्य पिल्लई यांनी सांगितले. नागपूरसह विदर्भातील बहुतेक कृती याेजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रियाच स्पष्ट नाही. नागपूरसह चंद्रपूर, गाेंदिया, वर्धा, अकाेला, वाशिम, बुलढाणा या शहरांचा हिट ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे. शिवाय नाेडल अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र अनेक गाेष्टींचा अभाव आहे. यात महत्त्वाची कमतरता म्हणजे याेजनेसाठी निधीची स्पष्टता नाही. त्यामुळे याेजना कशी राबविणार, याबाबत शंका येते.
तापमानाचा वैज्ञानिक अभ्यास नाही
स्थानिक स्तरावरील तापमानाच्या परिस्थितीचा वैज्ञानिक अभ्यास दिसून येत नाही. दरवर्षी तापमान किती वाढते, पारा किती अंशावर गेल्यास मृत्यू ओढवतात किंवा आराेग्यावर परिणाम हाेतात? गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक याप्रमाणे काेणता घटक उष्णतेने अधिक प्रभावित हाेताे? या अभ्यासाद्वारे ठराविक तापमानाच्या प्रभावाची सीमारेखा लक्षात येते. विदर्भातील काेणत्याही शहराच्या याेजनेत हे दिसून येत नाही. आधीच खूप उशीर झाला आहे, हे लवकर निर्धारित करण्याची गरज आहे, असा इशारा पिल्लई यांनी दिला.
इतर महत्त्वाच्या त्रुटी
- वाढते तापमान कृषीला अधिक प्रभावित करते. एचएपीमध्ये त्याचा कुठलाही अभ्यास नाही.
- याेजनांमध्ये वृद्ध, घराबाहेरील कामगार, गर्भवती स्त्रिया अशा असुरक्षित गटाची यादी तयार आहे पण सुचविलेल्या उपाययाेजना या गटांवर लक्ष केंद्रित करीत नाही.
- उष्णता कृती याेजना स्थानिक परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन तयार करण्यात आले नाहीत.
- कृती याेजनांमध्ये पुरेशी पारदर्शकता नाही. या याेजना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही.
गेल्या वर्षी ५ शहरे जागतिक यादीत
गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी विदर्भातील पाच शहरे सर्वाधिक तापमानाच्या जागतिक यादीत समाविष्ट हाेते. चंद्रपूरचे तापमान जगात पहिल्या क्रमांकावर हाेते. शिवाय अकाेला, नागपूर, वर्धा व वाशिम शहरांनी उष्णतेचा उच्चांक गाठला हाेता.