नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला.
जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक आहेत. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले व शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता ते शिंदे गटात सामील झाले आहेत. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना जयस्वाल म्हणाले, पक्ष कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. पक्ष शिवसैनिकांचा आहे. विदर्भातील ७० टक्के शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीला जनादेश मिळाला होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अभद्र युती केली. ती तोडून आम्ही जनादेश पाळला. महाविकास आघाडी सरकार हे ५० टक्के राष्ट्रवादी, ४० टक्के काँग्रेस व फक्त १० टक्केच शिवसेनेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही मुक्त केली. बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी सामूहिक उठाव केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेकडून दीड वर्षापासून विदर्भाला मंत्रिपद नाही
- काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांना विदर्भाच्या प्रश्नांशी देणेघेणे नव्हते. देवेंद्र फडणवीस
सत्तेत आल्याशिवाय विदर्भाला न्याय मिळू शकत नव्हता. शिवसेनेने दीड वर्षापासून विदर्भाला एकही मंत्रिपद दिले नाही. वैधानिक विकास मंडळे अपंग केली. सिंचन प्रकल्पाचा कुणी मायबाप नव्हता. विदर्भाला वाऱ्यावर सोडले होते.