नागपूर : काही दिवसांपूर्वी आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. यावर तब्बल ५२९ आक्षेप नोंदविण्यात आले होते. आक्षेपानुसार निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी मोका तपासणी करून सर्व आक्षेप निकाली काढले आहेत. ठोस असे आक्षेप नसल्याने मतदार यादीत बदल होण्याची शक्यता नसल्याने इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. गुरुवारी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
३ जुलै पर्यंत या मतदार यादीवर ५१९ आक्षेप नोंदविण्यात आले होते. १९ जुलैला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता ती २१ जुलैला जाहीर केली जाणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत २२ लाख ४५ हजार ८०९ एकूण मतदार निश्चित करण्यात आले आहे. सर्व ५२ प्रभागांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर आक्षेप स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार मोका तपासणी केली. परंतु आक्षेपात फारसे तथ्य आढळून आलेले नाही.
प्रभागाच्या मतदार संख्येत बदल नाही
महापालिका निवडणुकीसाठी ५२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. सर्व प्रभागात तीन सदस्य अशा १५६ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत शहरातील मतदारांची संख्या २० लाख ९३ हजार ३९२ होती. आता त्यात १ लाख ५२ हजार ८०९ मतदारांची भर पडली आहे. ३१ मे २०२२ रोजीच्या मतदार यादीनुसार नागपुरात २२ लाख ४५ हजार ८०९ मतदार आहेत. प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत बदल होणार नसल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
२,७८३ बूथ कायम राहणार
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत ३८ प्रभागात २,७८३ बूथ होते. अगामी निवडणुकीत ५२ प्रभागातही इतकेच बूथ कायम राहतील. एका बूथवर ८०० च्या आसपास मतदार राहतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.