नागपूर : राज्य सरकारने गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही वार्षिक मूल्यदर तक्ता अर्थात रेडिरेकनर दरात कोणताही बदल केलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्रॉपर्टीचे रेडिरेकनर दर स्थिर आहेत. हे दर एप्रिल महिन्याच्या १ तारखेला महाराष्ट्र राज्यातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी स्थावर मालमत्तेचे वार्षिक दर तक्ते प्रकाशित करण्यात येतात.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य पुणेचे मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी सन २०२३-२४ करिता वार्षिक दर तक्ते व मूल्याकनाच्या मार्गदर्शक सूचना न बदलण्याबाबत तथा कायम ठेवण्याबाबतचे निर्देश ३१ मार्च रोजी दिले आहेत. याची प्रत मंत्रालयातील महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव आणि महालेखापाल, (लेखापरिक्षा)-२ नागपूर यांना पाठविली आहे. या आदेशामुळे ग्राहकांना प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना गेल्यावर्षीच्या रेडिरेकनर दरानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागतील.
शासनाच्या निर्देशानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता १ एप्रिल २०२४ पासून अंमलात असलेले सन २०२२-२३ चे (सन २०२३-२४ साठी लागू) वार्षिकदर तक्ते, मूल्यांकन मार्गदर्शक सूचना व बांधकाम दर संपूर्ण राज्यासाठी कायम ठेवण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष-२०१७ पासून एप्रिलच्या १ तारखेला रेडिरेकनर दरातील बदल जाहीर करण्यात येतो. हे वार्षिक दर तक्ते नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिसेस या सदराखाली एएसआर या ठिकाणी प्रोसेस येथे उपलब्ध आहेत.