नागपूर : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशीर असल्याचे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर राऊत यांनी खोचक टीका केली. सुप्रीम कोर्टात अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. अपात्र असताना १९ तारखेला जर कोणी शपथ घेणार असतील तर ते अत्यंत घटनाबाह्य आहे, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. यासह जय भवानी जय शिवाजी, संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ज्या पद्धतीनं या सरकारचं काम चालू आहे मागच्या सरकारने जनतेचं आणि राज्याचं हित पाहून घेतले होते. पण विरोधासाठी विरोध या भुमिकेतून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे. दिवस बदलत जातात भविष्यात सत्तांतर होत असतं, त्यामुळे विरोधासाठी विरोध असं काम करु नये. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना जर १९ तारखेला ते शपथ घेत असेल तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे.
पुढे राऊत म्हणाले, मी फडणवीस यांच्या शहरात आलोय. पक्षाच्या कामासाठी आलोय, सगळं जागच्या जागी आहे. माझं स्वागत करायला सगळे आलेय. हे चित्र महाराष्ट्रात दिसतेय. बंड हे भास आहे, शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडलीय. ५६ वर्षांत अनेक संकटं, वादळं आम्ही पाहिले. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला इथे पाठवलंय. मी शिवसैनीकांबाबत बोलतोय. इथे कुणाचे व्यक्तिगत कार्यकर्ते नसतात सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघातून अनेकजण आलेय. त्यांची आज मी बैठक घेतोय, असं राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवारी पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आहेत. नितीन तिवारी यांना पूर्व नागपूर शहर प्रमुख बनविल्यामुळे शहर शिवसेनेत असंतोष पसरला असताना राऊत यांचा हा दौरा पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे शिवसेनेने राऊत यांना नागपूरची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सातत्याने ते नागपूरचा दौरा करीत असतात. राऊत यांच्या नागपुरातील कार्यक्रमाची माहिती बुधवारी रात्रीपर्यंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नव्हती. आज दुपारी त्यांचे शहरात आगमन झाले. राऊत हे शहरातील शिवसेनेची गटबाजी संपवतील, असे बोलले जात आहे.