नागपूर : ए. आर. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, मनोहर जोशी, विलासराव देशमुख या माजी मुख्यमंत्र्यांवर जेव्हा न्यायालयाने ताशेरे ओढले किंवा प्रसारमाध्यमांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली असता पदाचे राजीनामे दिले व सत्ता सोडली. ती महाराष्ट्राची राजकीय नैतिकता होती. आता मात्र बेकायदेशीर सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे. ते कायदा मानण्यास तयारच नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नैतिकताच नाही, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी डॉ. देशपांडे सभागृहात विश्लेषण केले. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री आ. सुनील केदार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, जि. प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी आ. दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, भूपेश थलकर आदी उपस्थित होते.
यावेळी आव्हाड म्हणाले, व्हीपची नियुक्ती राजकीय पक्षाद्वारे केली जाते. भारत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती चुकीची होती. तुटलेल्या गटाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देता येणार नाही, असे सर्वोेच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना फक्त अपात्रतेवर निर्णय घ्यायचा आहे. शिवसेनेच्या तुटलेल्या गटाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देता येणार नाही. शिवसेनेचे प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोेधात मतदान करण्याचा व्हीप बजावला होता. तो व्हीप एकनाथ शिंदे यांनाही बंधनकारक आहे. त्यामुळे शिंदे यांचे गटनेतेपददेखील बेकायदेशीर ठरते, असे आव्हाड यांनी सांगितले. केवळ आमदार खरेदी करून सत्ता स्थापन केली जात असेल तर उद्या दोन उद्योगपती येतील व १५० आमदार खरेदी करून सत्ता बसवतील. मग लोकशाहीला अर्थ काय, असा सवाल करीत या बेकायदेशीर सरकारविरोधात बोला, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
देवेंद्रजींना निकाल कळला आहे
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कळला आहे. त्यामुळे ते आता या विषयावर काहीच बोलत नाहीत. शिंदे यांनी आज केलेल्या जाहिरातबाजीमुळे या केसचा निकाल लवकर लागला पाहिजे, अशी फडणवीस यांचीदेखील इच्छा असेल, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. न्यायव्यवस्था आपल्या हातातच आहे, अशी भावना काही लोकांची झाली आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला.
सरकार पाडण्यासाठीच राज्यपालांची नियुक्ती
- महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी राजकीय प्यादा बनून हालचाली केल्या, असा आरोपही आव्हाड यांनी केला.