नागपूर : रेल्वे स्थानकावर स्फोटके असलेली बॅग आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित स्फोटकांबाबत विविध दावे करण्यात येत असले तरी ही स्फोटके कमी क्षमतेची होती व स्फोट घडवून आणण्याचा उद्देश नव्हता, असा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. स्फोटकांची बॅग नेमकी तेथे कशी आली व कुणी ठेवली याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बॅगमध्ये १ बायकॅट स्ट्रीप, ३.३३ मीटर सेफ्टी फ्यूज व ५४ डेटोनेटर्स होते. काल रात्रीपासूनच सुरक्षा यंत्रणांकडून तपासाला सुरुवात झाली. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनदेखील शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारणा केली असता ५४ डेटोनेटर्समध्ये कमी प्रमाणात स्फोटक क्षमता होती. काही फटाक्यांप्रमाणे त्यात ‘कंटेंट’ असल्याची प्राथमिक माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. जर कुणी त्याला आग लावलीच तर पाच मीटरपर्यंतदेखील ठिणगी जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे पोलिसांकडून ‘एक्स्प्लोजिव्ह ॲक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तपास सुरू आहे. शहर पोलीसदेखील समांतर तपास करत आहेत. ही बॅग नेमकी कुणाची होती व कुणाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकासमोर सोडण्यात आली यादृष्टीने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खासगी कंपन्यांनादेखील विचारणा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॅगमध्ये १ बायकॅट स्ट्रीपचादेखील समावेश होता. ही स्फोटके व बायकॅट स्ट्रीप एका खासगी कंपनीत बनलेली आहेत. सर्वसाधारणत: बायकॅट स्ट्रिप्सचा वापर सशस्त्र दलांना गोळीबार किंवा स्फोटकांच्या आवाजाचा सराव व्हावा यासाठी होतो. खासगी कंपन्यांकडून अशी स्फोटके थेट सैन्याच्या ‘ॲम्युनेशन डेपो’मध्येच पुरविण्यात येतात. अशा स्थितीत ही सामग्री रेल्वेस्थानकाच्या बाहेर कशी आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत खासगी कंपन्यांनादेखील विचारणा करण्यात येत आहे.
‘जैश’च्या ‘रेकी’शी ‘लिंक’ नाही
काही महिन्यांअगोदर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी नागपुरातील रेल्वेस्थानक, संघ मुख्यालय व इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या स्फोटकांची त्या रेकीशी काहीही ‘लिंक’ नाही, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.