नागपूर : देवलापारच्या छवारी बीटमधून रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमी वाघाची जंगलवापसीची आशा कमीच दिसत आहे. सध्या या वाघावर गाेरेवाडा रेस्क्यू केंद्रात उपचार चालला आहे. सूत्राच्या माहितीनुसार एक्स-रे रिपाेर्टमध्ये वाघाच्या समाेरच्या डाव्या पायाचे हाड गंभीरपणे फ्रॅक्चर झाले आहे. पायाच्या हाडाचे चार-पाच तुकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पायाचे ऑपरेशन झाल्यानंतरही जंगलामध्ये स्वत: शिकार करण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात त्याला जंगलात साेडण्याची शक्यताही कमीच आहे. उल्लेखनीय म्हणजे १७ एप्रिल राेजी जंगलात लंगडत चालत असलेला हा वाघ दिसल्यानंतर रेस्क्यू पथकाने त्याला पकडून गाेरेवाड्याच्या उपचार केंद्रात आणले हाेते. येथे जखमी पायाचा एक्स-रे काढण्यासह त्याचे रक्तनमुने प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले हाेते.
- सुरू आहे उपचार
गोरेवाड़ा प्रकल्पाचे विभागीय प्रबंधक प्रमोद पंचभाई यांनी, सध्या वाघाची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली. त्याचे जेवण वैगेरे व्यवस्थित सुरू आहे. त्याच्या पायाला सूज असल्याने डाॅ. धूत व डाॅ. सुजित त्याची देखरेख करीत असून दुखणेराेधक व ॲन्टिबाॅयाेटिक औषधे दिली जात आहेत. काही दिवस त्याच्या स्थितीची शहानिशा केल्यानंतर डाॅक्टरांच्या सूचनेनुसार ऑपरेशन केले जाणार असल्याचे पंचभाई यांनी स्पष्ट केले.