नागपूर : विदर्भात पाण्याची कमतरता नाही, परंतु नद्यांमधील पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यात अजून हवे तसे यश आलेले नाही. देशातील ४० टक्के धरण महाराष्ट्र राज्यात असले तरी ८२ टक्के शेती कोरडवाहूच आहे. यामुळेच जलसिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तिरपुडे महाविद्यालयातर्फे या पुस्तकाच्या प्रकाशानासाठी पुढाकार घेण्यात आला.तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील ठवरे सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता झालेल्या झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भावना व्यक्त केल्या. विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारण तसेच उपाय यांची माहिती आहे. परंतु दुर्दैवाने त्या दिशेने वेगाने समोर जाणे आपल्याला शक्य झालेले नाही. राज्याचा अर्थसंकल्प ६० हजार कोटींचा आहे परंतु राज्यात ७५ हजार कोटी रुपयांच्या योजना अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मराठवाडा व विदर्भातील ज्या योजना लवकर पूर्ण होऊ शकतात, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विदर्भातील त्याचप्रमाणे मराठवड्यातील कृषीपंपांचा ‘बॅकलॉग’देखील भरून काढणार असून यासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सौरपंपांचेदेखील वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित पुस्तकामध्ये तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या सूचनांचा राज्य शासनाकडून अभ्यास करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर युगांतर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वनिता तिरपुडे, महासचिव वामनराव कोंबाडे, प्राचार्य डॉ.केशव पाटील, उपाध्यक्ष डॉ.टी.व्ही.गेडाम हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी पुस्तकाची रूपरेषा मांडली. महेश गौतम यांनी संचालन यांनी केले. तर मधुकर उईके यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
सिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची गरज
By admin | Published: March 30, 2015 2:35 AM