पंजाब व गोव्यावर लक्ष केंद्रित : आंदोलने सुरू राहणारकमलेश वानखेडे नागपूरदिल्लीनंतर गोवा व पंजाबमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान उभे करणाऱ्या आम आदमी पार्टीने भाजपचे ऊर्जाकेंद्र असलेल्या संघभूमी नागपुरात आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत. नागपूर महापालिकेची निवडणूक न लढण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे. एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर हल्ला चढवत असताना नागपुरात मात्र भाजप विरोधात निवडणूक न लढण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने नागपुरात दमदार एन्ट्री केली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नागपूरच्या रिंगणात उतरल्या होत्या. ज्या पक्षाशी नागपुरात साधी शाखा देखील नव्हती त्या पक्षाला तब्बल ७२ हजार मते मिळाली. विशेष म्हणजे लोकसभेतील पराभवानंतरही कार्यकर्ते खचले नाहीत तर उलट अधिक जोमाने कामाला लागले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे उमेदवार रिंगणात नव्हते. त्यावेळी नागपुरात पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतरही महापालिका, नागपूर सुुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, वाहतूक पोलीस, भूमी अभिलेख यासह विविध शासकीय कार्यालयाशी संबंधित नागरिकांच्या प्रश्नांवर ‘आप’ने आंदोलन सत्र सुरू ठेवले. रस्त्यांवरील खड्डे, उड्डाणपुलांची मागणी, पाणीपुरवठा यासारख्या नागरी प्रश्नांसाठी ‘आप’चे कार्यकर्ते सातत्याने रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत ‘आप’पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल व येथेही भाजपचा ताप वाढेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, नागपुरात न लढण्याची भूमिका ‘आप’ने घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर रहावे लागणार आहे.आधी विधानसभा, नंतर मनपानागपुरात ‘आप’ विजयी झाली तरी राज्यातील भाजपचे सरकार काम करू देणार नाही. विकास कामांसाठी निधी देणार नाही. दिल्लीची परिस्थिती येथेही निर्माण होईल व नागपूरकरांना वाटेल की ‘आप’चे लोक काम करीत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातही आधी विधानसभा ताब्यात घ्यायची व नंतर स्थानिक निवडणुकांच्या रिंगणात उतरायचे, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.- देवेंद्र वानखेडे संघटक व माजी विदर्भ संयोजक
मनपाच्या रिंगणात ‘आप’ नाही
By admin | Published: November 06, 2016 2:14 AM