लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोलीतील फॉर्च्यून मॉलच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या अभिषेक नरेंद्रसिंग बघेल नामक तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलीस अद्याप ठोस निष्कर्षाप्रत पोहचलेले नाहीत. त्यामुळे ही हत्या की अपघात ते अजूनही स्पष्ट झाले नाही.
वाठोड्यात राहणारा अभिषेक वैशालीनगरात मोबाईल शॉपी चालवत होता. त्याचे वडील नरेंद्रसिंग बघेल गुन्हे शाखेत सहायक फौजदार (रोखपाल) म्हणून कार्यरत आहेत. औषध आणण्याच्या निमित्ताने अभिषेक बुधवारी घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी वाठोडा पोलीस ठाण्यात गुरुवारी तशी तक्रार नोंदविली होती. पोलिसांकडून शोधाशोध सुरू असताना शुक्रवारी दुपारी धंतोलीतील फॉर्च्यून मॉलच्या पार्किंगमध्ये त्याचा मृतदेह आढळला. मृताच्या डोक्यावर मोठी जखम होती. बाजूलाच पडून असलेल्या त्याच्या दुचाकीचे हेडलाईट फुटलेले आढळल्याने हा अपघात आहे की हत्या, असा प्रश्न चर्चेला आला आहे. पोलिसांच्या मते डॉक्टरांकडून ठोस अहवाल मिळालेला नाही.
अभिषेकचा मृत्यू नेमका कसा झाला ते शोधून काढण्यासाठी पोलिसांनी मॉल तसेच आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एका सीसीटीव्हीत अभिषेक पार्किंगकडे जाताना दिसतो. मॉल बंद असताना तो तेथे कशाला गेला, तेसुद्धा स्पष्ट झाले नाही. दोन दिवस होऊनही अभिषेक बघेलचा मृत्यू नेमका कसा झाला, ते स्पष्ट झाले नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या संबंधाने पोलीस अधिकारी स्पष्ट बोलायला तयार नाहीत. चाैकशी सुरू असल्याचे गोलमाल उत्तर ते देत आहेत.
----
----