मेहा शर्मा
नागपूर : काेराेनानंतर हाेणारे म्युकरमायकाेसिसचे इन्फेक्शन धाेकादायक ठरत असून प्रसार वाढत असल्याने गंभीरता वाढली आहे. डाॅक्टरांच्या मते तातडीने औषधी व उपचार करणे नितांत गरजेचे आहे. मात्र फंगलविराेधी ‘ॲम्फाेटेरिसिन-बी’चा साठा मर्यादित व मागणी अधिक असल्याने चिंता वाढली आहे. लाेकमतने औषधाच्या उपलब्धतेबाबत डाॅक्टर, यंत्रणा आणि केमिस्टशी चर्चा केली. मात्र या औषधाच्या पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महापालिका व अन्न व औषधी विभागातच एकमत नसल्याचे दिसून येत आहे.
फार्मसी चालक सचिन बडजाते यांनी सांगितले, या औषधाची मागणी खूप कमी हाेती. मात्र म्युकरमायकाेसिसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने मागणी वाढली व शाॅर्टेज झाला. आठवडाभरात पुरवठा सुरळीत हाेईल अशी आशा आहे. दुसरे फार्मसीचालक सुशील केवलरमानी म्हणाले, पुरवठा मंद असल्याने औषधाचा तुटवडा आहे. मात्र एफडीएकडून औषधाचा पुरवठा किंवा किमतीबाबत कुठलेही मार्गदर्शन झाले. काळाबाजार राेखण्यासाठी थेट रुग्णालयांनाच पुरवठा करावा, असे आमचे मत आहे पण याबाबत कुठल्याही गाईडलाईन मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एफडीएच्या अधिकाऱ्यांमध्ये ॲम्फाेटेरिसिन-बी औषधाच्या पुरवठ्याबाबत संभ्रम आहे. विभागाचे अधिकारी पी.एम. बल्लाळ म्हणाले, यापूर्वी कधी या औषधाची फार मागणी नव्हती. केवळ कॅन्सर रुग्णांनाच दिली जात हाेती. मागणी वाढल्याने केंद्र सरकारने १५ दिवसांपूर्वीच उत्पादन सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे पुरवठा हाेण्यास आणखी आठवडा लागेल, अशी शक्यता आहे. यंत्रणा तसेच एफडीएचे अतिरिक्त आयुक्त यांनी जबाबदारी घेतली आहे. औषधाच्या दराबाबत नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी-एनपीपीएकडे प्रपाेजल सादर केल्याचे बल्लाळ यांनी स्पष्ट केले.
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा म्हणाले, औषधांचा तुटवडा आहे आणि आम्ही ताे नाकारत नाही. सध्या पर्यायी औषधांबाबत प्रयत्न चालले आहेत. प्रशासनाने राज्य शासनाकडे लवकर औषध पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. यावेळी १६५०० ॲम्फाेटेरिसिन-बी व्हायल महाराष्ट्राकडे प्राप्त झाल्या असून लवकरच त्या नागपूरला प्राप्त हाेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याबाबत विचारले असता कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. नितीन देवस्थळे यांनी म्युकरमायकाेसिसच्या उपचारासाठी ॲन्टीफंगल औषधांची त्वरित गरज असल्याचे सांगितले. आपण आतापर्यंत म्युकरमायकाेसिसच्या १७ रुग्णांना तपासले असून ४ ते ५ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्वरित फंगल इन्फेक्शन राेखण्यासाठी औषधांची गरज असते. मात्र तुटवड्यामुळे रुग्णांच्या उपचारावर परिणाम हाेत असल्याचे ते म्हणाले.
म्युकरमायकाेसिसचा वेगाने हाेत असलेला प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी ॲम्फाेटेरिसिन-बी औषध प्रभावी आहे पण शाॅर्टेजमुळे रुग्णांची चिंता वाढविली आहे. या संभ्रमित अवस्थेत औषधांची उपलब्धता वाढविण्यावर रुग्णांचा श्वास अवलंबून आहे.