गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी जैवविवधता उद्यानात पर्यटनाच्या नावाखाली अलीकडे मनमौजी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एकेकाळी फक्त पक्षी अभ्यासक आणि पक्षी छायाचित्रकारांसाठीच प्रवेश असणाऱ्या या उद्यानात आता शुल्क भरून पर्यटक जातात, मनात येईल तसे वागतात. परिणामत: भविष्यात येथील पक्षिवैभव धोक्यात येऊन डोळ्यादेखत नष्ट होण्याचा धोका वाढला आहे.राज्य शासनाने ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताह जाहीर केला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी खंत आणि तळमळ व्यक्त करणारी तक्रार पक्षी अभ्यासकांकडून करण्यात आली. कार्तिक चिटणीस या युवा पक्षी अभ्यासकाने केलेल्या तक्रारीत भविष्यातील धोका व्यक्त करतानाच येथील गलथानपणाही उघड केला आहे. हे उद्यान वन पर्यटन म्हणून घोषित झाल्यापासून पक्षी अभ्यासक कमी आणि मनमौजी पर्यटकच अधिक वाढले आहेत. अनेक जोडपी या मुक्त वातावरणात फिरायला येतात. झुडपात शिरून संगीताचा आनंद घेतात, वाद्य वाजवतात. बरीच मंडळी परिवारासह पर्यटनला येतात. पर्यटनाचे नियम, धोरणाचा पत्ता कुणालाही नसतो. एवढेच नाही तर पार्कमध्ये कसे वागावे, यासंदर्भात कुणीही हटकत नाही. माहिती नाही, मार्गदर्शनही नाही. आपल्याच आनंदात फिरणाऱ्या या पर्यटकांमुळे पक्षी विचलित होतात.
कालव्याजवळचा अधिवास पक्ष्यांनी सोडलायेथील नाल्यावर कालवा बांधून वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बांधला जात आहे. दीड वर्षापासून हे काम सुरू आहे. यंत्रांचा आवाज, कामगारांची वर्दळ, आवाज यामुळे या परिसरातील पक्ष्यांनी तेथील अधिवास सोडला आहे. हा नाला म्हणजे एकेकाळी विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा हॉट स्पॉट होता. पक्षी निरीक्षक विनीत अरोरा यांच्या निरीक्षणानुसार, अनेक वर्षापासृून येथे नवरंगा राहायचा. यंदा त्याने ही जागा सोडली. कॉमन किंग फिशरही ही जागा सोडून गेले आहेत.
आगीमुळे धोकाकाही महिन्यापूर्वी येथे आग लागली होती. पक्षी झाडावर राहत असले तरी त्यांचे खाद्य गवतामध्ये असते. आगीत गवत जळाल्याने खाद्य संपुष्टात आले. परिणामत: पक्षी दुसरीकडे गेले. या बर्ड पार्कमध्ये वाढलेली माणसांचा अविवेकी वावर आता धोकादायक ठरायला लागला आहे.