लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये भरती असलेल्या कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाचे नमुने शुक्रवारी निगेटिव्ह आले. सध्यातरी नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. दरम्यान, सकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ नागपूर शहरातदेखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची शुक्रवारपासून ‘थर्मल स्कॅनिंग’ सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर माता कचेरी परिसरातील आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी करण्यात येणाºया प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. राजेश गोसावी, मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण, एफडीएचे पी.एन. शेंडे, मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मानेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. बी. पातुरकर, मनपाचे डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोग्य विभागाची डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली आहे. त्यांना ‘थर्मल स्कॅनिंग’व प्रतिबंधक किटची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना विषाणू संशयित रुग्णांसाठी मेडिकलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत ३९ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत नागरिकांनी भीती बाळगू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना प्रतिबंधासाठी काळजी घेणे, हाच उपाय असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.इटलीचे दोन संशयित रुग्ण नागपुरातइटलीमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने सर्वात जास्त भारताची चिंता वाढवली आहे. आपल्याकडे सर्वाधिक प्रकरणे इटलीतून आलेल्या लोकांमध्ये दिसून आली आहे. इटलीतून नागपुरात आलेले दोन पुरुष संशयित रुग्णांनी मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागाला गुरुवारी भेट दिली. परंतु त्यांना विशेष लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले.
नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; प्रशासनाकडून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 11:12 AM
सध्यातरी नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
ठळक मुद्देविमानतळावर प्रवाशांची ‘थर्मल स्कॅनिंग