लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मागील १२ दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्या १५ ते २५ दरम्यान दिसून येत आहे. मृत्यूची संख्याही दोनच्या आत आहे. यामुळे नागपूरकरांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र तज्ज्ञांनी याला नाकारले आहे. व्यापक लसीकरण नसल्यास व विषाणूत बदल झाल्यास पुन्हा रुग्ण वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेला हैराण केले होते. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले होते. जानेवारी ते जून यादरम्यान तब्बल ३ लाख ५३ हजार २८५ नवे रुग्ण आढळून आले. परंतु त्यातुलनेत लक्षणे नसलेल्या म्हणजे, नकळत कोरोना होऊन गेलेल्यांचे प्रमाण मोठे होते. नुकत्याच झालेल्या लहान मुलांमधील लसीकरणाच्या मानवी चाचणीत १०० पैकी १८ टक्के मुलांमध्ये ‘अॅण्टिबॉडीज’ वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ४ जुलैपासून ते आतापर्यंत रोजची रुग्णसंख्या २५ च्या आत आहे. मागील १२ दिवसापैकी सहा दिवसात एकाही मृत्यूची नोंद नाही. यावरून नागपूरकरांमध्ये मोठ्या संख्येत ‘हर्ड इम्युनिटी’ वाढली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-‘हर्ड इम्युनिटी’मुळे दुसरी लाट ओसरली असे नाही - डॉ. देशमुख
प्रसिद्ध वरिष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, कोरोनाची पहिली व दुसरी लाट अचानक वर जाऊन झपाट्याने खाली आली आहे. यामुळे लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाली म्हणून लाट ओसरली, असे म्हणता येणार नाही. कोरोनाच्या अशा लाटा येतच राहणार आहे. मात्र, याची तीव्रता विषाणूतील बदल व लसीकरणावर अवलंबून असणार आहे. जेवढे जास्त लसीकरण तेवढा कोरोनाचा प्रभाव कमी राहणार आहे.
- ७० टक्के लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ नाहीच - डॉ. तायडे
प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, ७० टक्के लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाल्यावरच कोरोनासारख्या विषाणूचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. मात्र, कोरोना विषाणूमध्ये होत असलेल्या बदलांमुळे याची शक्यता फार कमी आहे. सध्यातरी तसे दिसून येत नाही. कोरोनाची लाट येत राहणार आहे. त्याची गंभीरता कमी करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.
-विषाणूचा प्रभाव कमी झाल्याने रुग्ण कमी - डॉ. अरबट
प्रसिद्ध श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाल्याने कोरोनाचा प्रभाव कमी झाला, असे म्हणता येणार नाही. विषाणूचा प्रभाव कमी झाल्याने रुग्णसंख्या वाढत नसल्याचे त्यामागील कारण असावे. विषाणूत बदल झाल्यास किंवा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ आल्यास पुन्हा आपल्याकडे रुग्ण वाढू शकतील. यावर उपाय म्हणजे, व्यापक लसीकरण हाच आहे.
:: महिनानिहाय कोरोनाचे रुग्ण
जानेवारी : १०,५०७
फेब्रुवारी : १५,५१४
मार्च : ७६,२५०
एप्रिल : १,८१,७४९
मे : ६६,८१८
जून : २,४४७
१५ जुलैपर्यंत : ३६१