महापालिकेचा खोटारडेपणा : माहितीच्या अधिकारातून ‘पोलखोल’नागपूर : शहरात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या विविध भागांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु नागपुरात एकही खड्डा दिसत नाही, असा माहितीच्या अधिकारातच महानगरपालिकेने असा दावा केला असून मनपाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांत खड्डे पडले असताना माहितीच्या अधिकारातून मनपाचा खोटारडेपणा उघड झाला आहे.शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील खड्ड्यांसंदर्भात महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार शहराच्या हद्दीत असलेल्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम ‘हॉट मिक्स प्लँन्ट मशीन’च्या आधारे नियमितपणे करण्यात येते. परंतु शहरात तर अनेक ठिकाणी गेल्या कित्येक महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. महानगरपालिका प्रशासनाचे त्याच्याकडे बहुधा लक्ष गेलेले नाही. दरम्यान, विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केल्यानंतर ते बुजविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेचीच असते खड्डे न बुजविल्यामुळे रिलायन्स जियो इन्फोकॉम लि. यांच्याकडून २ कोटी १८ लाख १५ हजार ५५२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असेदेखील माहितीमध्ये नमूद आहे.(प्रतिनिधी)नागरिकांद्वारे प्राप्त झाल्या केवळ १४ तक्रारीशहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात शहरातील नागरिकांकडून रोज ओरड करण्यात येते. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. परंतु मनपाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१३ ते २० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत केवळ १४ नागरिकांनीच तक्रारी दाखल केल्या आहेत. मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक यांच्याकडून ४२७ तक्रारी प्राप्त झाल्या तर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी १८७ तक्रारी केल्या. अधिकारी हवेत उडतात का ?नागपूर शहरातील अनेक भागांमधील रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. परंतु मनपाने दिलेल्या अधिकृत उत्तरात एकही खड्डा नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटारडा तर आहेच. यामागे मनपातील भ्रष्टाचार कारणीभूत आहे की अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बहुधा मनपाचे अधिकारी थेट हवेतूनच प्रवास करत असावेत. म्हणूनच की काय शहरात एकही खड्डा नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे..
शहरात एकही खड्डा नाही !
By admin | Published: February 05, 2016 2:22 AM