अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्यास दया नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:03 AM2018-12-01T11:03:01+5:302018-12-01T11:05:11+5:30
अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपींना कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.
राकेश घानोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाºया आरोपीवर दया दाखवली जाऊ शकत नाही. पोक्सो कायद्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी अशा आरोपींना कायद्यात सांगितल्यानुसार कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.
दया दाखवून कारावासाची शिक्षा कमी करावी अशी विनंती प्रकरणातील आरोपीने न्यायालयाला केली होती. न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये व पुरावे लक्षात घेता आरोपीची विनंती फेटाळून लावली. अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचार व छळापासून संरक्षण करण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून संसदेने पोक्सो कायदा लागू केला. तसेच, बालकांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली. या कायद्यात सांगितलेल्या व्याख्येनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपीवर दया दाखविली जाऊ शकत नाही. तसेच, बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला पोक्सो कायद्यात सांगितल्यानुसार कमाल शिक्षा सुनावणे आवश्यक आहे असे निरीक्षण न्यायालयाने या निर्णयात नोंदविले.
३१ जानेवारी २०१८ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने वरील बाबी स्पष्ट करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला व आरोपीचे अपील फेटाळून लावले.
असे आहे प्रकरण
ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीत घडली होती. आकाश देवानंद टेम्पे (२८) असे आरोपीचे नाव असून तो कबीरनगर येथील रहिवासी आहे. १५ एप्रिल २०१६ रोजी पीडित मुलगी तिच्या आईसोबत एका लग्नात गेली होती. दरम्यान, आरोपीने मुलीला बळजबरीने एका पडक्या घरात नेले व तिच्यावर बलात्कार केला. नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. ती इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. साक्षीदारांचे बयान, वैद्यकीय व रासायनिक अहवाल यावरून आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले.