गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या नागपूर शहरात सुमारे ५० वर डॉग ब्रिडर्स आहेत. मात्र, नोंदणी एकाचीही नाही. देशी-विदेशी प्रजातीच्या महागड्या कुत्र्यांच्या विक्रीतून लाखोंची उलाढाल शहरात होत असली तरी कागदावर नोंदी कुठेच नाही. एवढेच काय तर घरी कुत्रे पाळणाऱ्या नागरिकांनीही नोंदी केलेल्या नाही. (There is no record of foreign dogs in the Nagpur)
शहरवासीयांचे श्वानप्रेम चांगलेच वाढले असले, तरी वर्षाला होणारी नोंदणी जेमतेम १०० च्या वर आहे. पाच हजारांपासून ते एक लाखापर्यंतचे देशी -विदेशी जातींचे श्वान पाळणारे व त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करणारे नागरिक शहरात आहेत. मात्र, कुत्र्यांच्या रीतसर नोंदणीकडे दुर्लक्ष आहे. यामुळे शहरात पाळीव कुत्री किती, याचा आकडाच महानगर पालिकेकडे नाही.
महानगर पालिकाही नोंदणीसाठी पुढाकार किंवा आवाहनही करताना दिसत नाही. एखाद्याचे महागडे कुत्रे हरविले किंवा चोरीस गेले तेव्हाच अनेकांना या नोंदणी प्रक्रियेची आठवण येते, ही वस्तुस्थिती आहे. नोंदणीची संख्या कमी असण्याचे कारण विचारले असता, पाळीव श्वानांची नोंद करणे आता बंधनकारक नसल्याचे मनपाच्या पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
शहरामध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक डॉग ब्रिडर्स आहेत. उच्च प्रतीच्या देशी-विदेशी कुत्र्यांच्या पिलांची पैदास करून विक्रीचा व्यवसाय ही मंडळी करतात. मात्र, एकाही डॉग ब्रिडर्सची नोंद पशुवैद्यकीय विभाग अथवा महानगर पालिकेकडे नाही. सारेच बिनधास्त आणि कायदा खिशात ठेवून आहेत. ऑगस्ट महिन्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणीसाठी ६० दिवसांचा अल्टिमेटम देऊन दंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता कुठे नोंदणीसाठी अर्ज यायला लागले आहेत.
तेरी भी चूप, मेरी भी चूप
- प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम-१९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम - २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन नियम - २०१७ नुसार या व्यावसायिकांनी प्रशासनाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. अधिनियम अस्तित्वात येऊन तीन वर्षे लोटूनही ऑगस्टपर्यंत शहरात एकाही व्यावसायिकाने नोंदणी केली नव्हती.
- प्राणी आणि पक्ष्यांच्या खाद्यान्न विक्रीचा फलक लावून त्या आड पक्षी आणि प्राण्यांची (विशेषत: देशी-विदेशी कुत्र्यांची) विक्री या दुकानांमध्ये होते. मात्र, दुकानदारांची नियमांकडे पाठ आहे. यंत्रणाही डोळे मिटून आहे.
...