लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील नागरिकांत भीतीचे वातावण आहे. त्यातच रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्री अधिक आक्रमक दिसत आहे. यामुळे कुत्री व जनावरांना कोरोनाचा संसर्ग तर झाला नाही ना? अशी शंका काही लोक व्यक्त करीत आहेत. परंतु जनावरांपासून कोरोना संसर्ग होण्याची कुठल्याही प्रकारची शक्यता पशुतज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे.विदेशात माणसापासून सिंह व मांजराला कोरोना संसर्ग झाल्याच्या काही तुरळक घटना घडल्या. परंतु जनावरांपासून माणसाला संसर्ग झाल्याची एकही घटना घडलेली नाही. तसेच भारतात माणसापासून जनावराला संसर्ग झाल्याची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे मोकाट कुत्री वा जनावरांपासून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाही. कुत्र्यांना कोरोना बाधा झाल्याबाबतची शंका निराधार आहे. नागपूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या दीडशेच्या जवळपास पोहचली आहे.हॉटस्पॉट क्षेत्र सील करण्यात आले. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर अजूनही कायम असला तरी संसर्गाचा धोका नाही. नागपूर शहरात ८० ते ९० हजार मोकाट कुत्री आहेत. ३५०च्या आसपास जनावरांचे गोठे आहेत. अनेक लोकांच्या घरी कुत्रे व मांजर आहेत. परंतु या जनावरांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही.
जनावरांपासून बाधा होण्याची शक्यता नाही
विदेशात सिंह, मांजर अशा प्राण्यांना कोरोना बाधा झाल्याच्या तुरळक घटना पुढे आल्या आहेत. त्यांना माणसापासून बाधा झाली. जनावरांपासून बाधा झाल्याचे अद्याप पुढे आलेले नाही. भारतात जनावराला कोरोना बाधा झाल्याचा एकही रिपोर्ट आलेला नाही. जनावरांपासून बाधा होण्याची कोणतीही शक्यता नाही.
डॉ. नितीन कुरकुरेसंचालक, संशोधन पशुविज्ञान विद्यापीठ
जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता नाकारली
जनावरांपासून माणसाला कोरोना बाधा होण्याची कुठल्याही प्रकारची शक्यता नसल्याचे जागितक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आाहे. गोपालकांनी वा कुत्री पाळणाऱ्यांनी कोरोना भीतीमुळे आपल्या जनावरांना मोकाट सोडू नये. त्यांची चारापाण्याची काळजी घ्यावीडॉ.
गजेंद्र महल्ले, पशुचिकित्सक अधिकारी, मनपा