पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांची स्पष्टोक्ती : नागपूरकरांच्या प्रश्नांना मान्यवरांची थेट उत्तरेनागपूर : अनेकदा असे म्हटले जाते की भारत आणि पाकिस्तानदरम्यान कुठली तरी तिसरी शक्ती आहे. परंतु अशी कुठलीही शक्ती अस्तित्वात नाही. पाकिस्तानच्या सेनेबाबतदेखील अनेक गैरसमज आहे. परवेझ मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष असताना दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी बरेच प्रयत्न झाले होते ही बाब लक्षात घ्यायला हवी, असे मत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’अंतर्गत आयोजित ‘इंडिया अॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रातील प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान ते बोलत होते.पाकिस्तानमध्ये सैन्याचे महत्त्व आहे. परंतु सैन्यदल दोन्ही देशांमधील शांती प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे बासित म्हणाले. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा केवळ जागेचा मुद्दा नाही तर तो लोकांच्या भावनांशी जुळलेला मुद्दा आहे. त्यामुळे याला बाजूला ठेवून चर्चा शक्यच नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात बासित म्हणाले. पाकिस्तान हा मुस्लिम देश आहे. परंतु याचा अर्थ ‘मॉडर्न’ होण्यास आमचा विरोध आहे असे नाही. देशात आम्ही अल्पसंख्यकांना सारखेच महत्त्व देतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी नागपुरातील राजकीय, शिक्षण, प्रशासकीय, सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय, विधी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.‘सार्क’ परिषदेकडून अपेक्षादक्षिण आशियातील देशांच्या विकासासाठी ‘सार्क’ हा अतिशय चांगला मंच आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील ताणलेल्या संबधांमुळे याचा हवा तसा उपयोग होऊ शकला नाही. परंतु या वर्षी इस्लामाबाद येथे होणाऱ्या ‘सार्क’ देशांच्या बैठकीत सकारात्मक निर्णयांची अपेक्षा आहे, असे अब्दुल बासित म्हणाले. ‘सार्क’ देशांमध्ये संयुक्त ‘सॅटेलाईट’ प्रणालीच्या विरोधात पाकिस्तानची भूमिका नाही. परंतु त्याची संयुक्त व्यवस्थापन व्यवस्था निर्माण व्हावी, असे आमचे म्हणणे आहे. परंतु भारत यासाठी तयार नाही. याबाबत चर्चा सुरू आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.अफगाणिस्तानसोबत भारताचे मजबूत संबंधअफगाणिस्तानमधील भारताच्या सक्रिय भूमिकेसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे भारताचे माजी राजदूत विवेक काटजू यांनी उत्तर दिले. भारताचे अफगाणिस्तानसोबत मजबूत संबंध आहेत. पाईप लाईनच्या करारावर स्वाक्षरी झालेली आहे. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने अफगाणिस्तानमधील वातावरण चिंताजनक आहे. तरीदेखील भारत तेथे विविध प्रकल्पांवर काम करत आहे. अफगाणिस्तानातील सलमा धरणाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे जाणार आहेत. याचे स्वागत व्हायला हवे. देशातील अभियंत्यांनी अनेक अडचणींचा सामना करत याचे निर्माण केले. जर भारत-पाकिस्तानदरम्यान चर्चा झाली तर अफगाणिस्तानचा विषयदेखील निघायला हवा, असे ते म्हणाले.प्रेम व कूटनीतीत जास्त बोलणे योग्य नाहीभारत पाकिस्तानच्या संबंधांना समोर कसे न्यायचे याबाबत भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांना विचारणा केली असता प्रेम आणि कूटनीती यात जास्त बोलणे योग्य नसते. जास्त समजविल्याने गोष्टी बिघडू शकतात, असे उत्तर त्यांनी दिले. दोन्ही देशांनी आपल्या समस्या तिसऱ्याकडे नेण्याची आवश्यकता नाही. एकमेकांशीच चर्चा करून समस्यांकडे वेगळ्या नजरेने पहायला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.
जबाबदारी निश्चित व्हावीपाकिस्तानसोबत शांतता चर्चेचा पाया कॉंग्रेसने रचला होता. भाजपा त्यावरच काम करत आहे. दोन्ही देशांमधील समस्या दूर व्हाव्यात यासाठी सरकारने जबाददारी निश्चित करायला हवी. यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, असे मत कॉंग्रेस प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना व्यक्त केले.
विश्वास निर्माण करणे आवश्यकभारत व चीनदरम्यान ज्याप्रमाणे सीमाप्रश्न सोडून चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानसोबत काश्मीर मुद्दा सोडून चर्चा होऊ शकते का, असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांना विचारण्यात आला. काश्मीर समस्येसंदर्भात अनेक उपाय समोर आले आहेत. दोन्ही देशांमध्ये यासाठी विश्वास असणे आवश्यक आहे. जेव्हा दोन्ही देशांतील जनता यात सहभागी होईल तेव्हा हे शक्य होईल. जनमत फार मौलिक असते, असे ते म्हणाले.