ऑनलाईन लोकमत नागपूर : संभाजी महाराज एक योद्धा आणि धर्म-स्वराज्यासाठी समर्पित वृत्ती जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेतच़; परंतु त्यासोबतच त्यांच्या अंगी एक चिकित्सक वृत्तीही होती़ त्यांनी अनेक संशोधने केली़ युद्धात लोखंडाच्या तोफा वागवणे सैनिकांना कठीण जात होते़ तो त्रास वाचवण्यासाठी त्यांनी लाकडाच्या तोफेची संकल्पना मांडली आणि ती यशस्वी करूनही दाखवली़ एकाच वेळी ते पराक्रमी राजा ते प्रयोगक्षम संशोधनकर्ता अशा दोन भूमिका जगले. जगाच्या इतिहासात संभाजीसारखा असा योद्धा झाला नाही, अशा शब्दात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगितला. संवेदना परिवार संस्था आणि पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगर येथील राममंदिराच्या पटांगणात वंदनीय उषाताई चाटी स्मृती कीर्तन परिसरात आयोजित स्वातंत्र्यवीर वि.दा़ सावरकर कीर्तन महोत्सवाचा गुरुवारी प्रारंभ झाला. पहिले पुष्प आफळे यांनी ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे’ या विषयावर गुंफले़ महोत्सवाचे उद्घाटन समर्थ सद्गुरू माऊली श्री दत्त संप्रदायवर्धक विजयकाका पोफळी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले़ प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ़ विलास डांगरे, डॉ़ मदन कापरे व नगरसेविका परिणीता फुके उपस्थित होते. यावेळी आरती कुळकर्णी व शैलेश कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला़ आफळे कीर्तनात पुढे म्हणाले, संभाजी महाराजांच्या सृजनशील व्यक्तिमत्त्वातून अनेक काव्य रचली गेली़ एकाच वेळी वेगवेगळ्या मोहिमा गाजवताना शत्रूवर प्रचंड जरब बसविली़ रामसेतूच्या धर्तीवर राजांनी कोकणातील मुरुड जंजिरा किल्ला हस्तगत करण्यासाठी समुद्री खाडीच बुजवण्याचा चंग बांधला होता़ या किल्ल्याला समुद्रामुळे रक्षण मिळते, हे त्यांनी हेरले होते़ हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही़ परंतु संभाजी राजे काहीही करू शकतात, याची भीती शत्रूच्या मनात कायम दडली गेली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या महोत्सवासाठी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष निखिल गडकरी, सागर कोतवालीवाले, डॉ़ दीपक खिरवडकर, रश्मी फडणवीस, मिलिंद वझलवार, डॉ़ हर्षवर्धन मार्डीकर, डॉ़ मोहन देशपांडे, शैलेश कुळकर्णी, डॉ़ मंजूषा मार्डीकर, डॉ़ अनघा देशपांडे, स्वाती कुळकर्णी परिश्रम घेत आहेत़