लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात सुरू असलेला पाणीटंचाईचा फटका मनपाच्या वाचनालयालाही बसला आहे. वाचनालयातील पाणी संपल्यामुळे ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहे. नागपूर महानगरपालिकाद्वारे संचालित असलेल्या उत्तर नागपुरातील डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय व श्रीमती उषाराणी महिला वाचनालय, अशोकनगर येथे दररोज ३०० ते ४०० विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाकरिता येतात. हे वाचनालय २४ तास सुरू असणारे नागपूर शहरातील प्रतिष्ठित वाचनालय आहे. येथे संपूर्ण शहरासह ग्रामीण भागातीलही विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाकरिता येतात. गेल्या आठवडाभरापासून पाणीटंचाईमुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात तर तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड नागरिकांची आहे. याच पार्श्वभूमीवर वाचनालयाचे सहा. ग्रंथपाल खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, वाचनालयास पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत: पाण्याची सोय करावी. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासंबंधी प्रश्न निर्माण झाला आहे. वाचनालयात पिण्याच्या पाण्याचा साठा करणारी टाकी लहान असून त्यात फक्त एकाच दिवसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. खंडित पाणीपुरवठ्यामुळे टाकी रिकामी राहत आहे. वाचनालयात पिण्याच्या पाण्याची टाकी बदलवून मोठी टाकी लावण्यात यावी व वाचनालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम लावण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पहिल्यांदाच २४ तास सुरू असणाऱ्या मनपाच्या या वाचनालयावर पाणीकपातीमुळे काही दिवस कोरडेच राहण्याची वेळ आली आहे.
नागपूर महापालिकेच्या वाचनालयातही नाही पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:16 PM
शहरात सुरू असलेला पाणीटंचाईचा फटका मनपाच्या वाचनालयालाही बसला आहे. वाचनालयातील पाणी संपल्यामुळे ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहे.
ठळक मुद्देग्रंथपालांनी दिल्या विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना